Join us  

भाजीपाला महागला

By admin | Published: April 12, 2017 2:04 AM

वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी एपीएमसी घाऊक बाजारपेठेतील भाज्यांची आवक कमी झाली असून, दरांमध्ये २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई

वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी एपीएमसी घाऊक बाजारपेठेतील भाज्यांची आवक कमी झाली असून, दरांमध्ये २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ६५० ते ७०० गाड्या भाजीपाल्याची आवक होते. मात्र, मंगळवारी ११२ ट्रक आणि ४८७ टेम्पो इतक्या भाजीपाल्याची आवक झाली. बदलत्या हवामानाचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला असून, प्रचंड उष्णतेमुळे मळ्यातील भाज्या करपल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.उष्णतेमुळे भाज्यांना कीड लागल्यानेही आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. मिरची, टोमॅटो,भेंडी, गवार, शेवगा आदी भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. त्याचबरोबर पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. १४ ते १५ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली असून, ती किलोला २० ते २२ रुपये दराने उपलब्ध होती. ८ ते १० रुपयाने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव १५ ते १६ रुपये, १८ ते २० रुपये किलोने दराच्या गवारच्या किमतीत वाढ होऊन २५ ते २६ रुपये इतकी झाली. २० रुपये किलो दराने विकला जाणारा शेवगा २५ ते ३० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. पालेभाज्यांच्या दरातही दुपटीने वाढ झाली आहे. मेथी १० ते २० रुपये जुडी, पालक ५ ते १० रुपये, कोथिंबीर १५ ते २० रुपये दराने उपलब्ध आहे. एपीएमसी घाऊक बाजारपेठेत प्रति क्विंटलनुसार कोबी ४०० ते ८०० रुपये, फ्लॉवर ५०० ते १००० रुपये, फरसबी ३००० ते ३५००, टोमॅटो १२०० ते ३००० रुपये, गवार ३००० ते ३६०० रुपये, भेंडी १००० ते ३२०० रुपये, वांगी ४०० ते १२०० रुपये, कांद्याची पात ६५० ते ७००, ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये दराने उपलब्ध आहे. कांद्याचे दर स्थिरावलेवाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर स्थिरावले असून, घाऊक बाजारपेठेत ५ ते ७ रुपये किलो दराने कांदा उपलब्ध आहे. प्रतिक्विंटल ५०० ते ७०० रुपये दराने कांद्याची विक्री होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू आदी परिसरातून मंगळवारी ८८ गाड्या बाजारात दाखल झाल्या. हलक्या प्रतिचा कांदा ३ ते ५ रुपये किलो दराने उपलब्ध आहे.- मार्चअखेरपर्यंत भाज्यांचे दर आटोक्यात येतील. मात्र त्यानंतर दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उष्णतेमुळे भाजीपाला फार काळ टिकत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जम्मू काश्मीर खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिमाचलमधील शिमला सलोन येथून येणाऱ्या वाटाण्याची आवकही पूर्णपणे बंद झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळेही आवक घटल्याचे व्यापारीवर्गाने स्पष्ट केले.