वांद्रयात एकेकाळी होते भाज्यांचे मळे, इतिहासातील अनोख्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 09:53 AM2023-12-04T09:53:42+5:302023-12-04T09:54:56+5:30
वांद्र्याच्या पश्चिम व पूर्वेला रोजगारासाठी रोज साडेचार ते पाच लाख लोक स्टेशनवर उतरतात, असा अंदाज आहे. खरं तर संपूर्ण वांद्रे एवढ्या जागेत मावणे शक्यच नाही. पण, गावाचा इतिहास, भूगोल व वर्तमान डोळ्यांसमोर आणण्याचा हा प्रयत्न.
संजीव साबडे, मुक्त पत्रकार
पोर्तुगीज मुंबईत १८३४/३५ च्या सुमारास आले, सात बेटांना एकत्र करून मुंबई तयार झाली, पुढे ब्रिटिश राजपुत्र दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरिना ब्रागेंझा हिच्या विवाहाच्या वेळी म्हणजे १६६१ साली पोर्तुगीजांनी मुंबई ब्रिटिशांना आंदण दिली, हा इतिहास शाळेत शिकवला गेला असेलच. पण त्यावेळी मुंबईजवळचे सालसेट म्हणजे साष्टी बेट मात्र ब्रिटिशांना देण्यात आलं नाही. ते तेव्हा मुंबईचा भाग नव्हतं.
वांद्रे हे या बेटाचा भाग होते आणि ते बेट आणखी सुमारे १०० वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. मुळात तिथं होतं बंदर. ते वांदोरा नावानं ओळखलं जाई. त्यातूनच बांद्रा व वांद्रे हे नाव आलं. चाच्यांपासून संरक्षणासाठी तिथं कॅस्टेला-डी-अगुआदा नावाचा किल्ला पाणथळ जमिनीवर बांधला. त्याचे अवशेष आजही आहेत. तो भाग म्हणजे लँड्स एंड. ताज लँड्स एंड हे बडे हॉटेल तिथं आहे. तेव्हाच्या वांद्र्यात म्हणे २२ पाखाड्या होत्या, अनेक वाड्या होत्या. कुर्ला, धारावी, खार याबरोबरच चिंबई, रानवर, चुईम, शेर्ली, पाली, राजन अशी अनेक गावं होती. कोळी, भंडारी, ख्रिश्चन, इस्ट इंडियन, मुस्लीम वस्ती होती. भातशेती मोठ्या प्रमाणात होई. नारळाची झाडं, भाज्यांचे मळे, मिठागार व मच्छीमारी हे उदरनिर्वाहाचे साधन होते. वांद्रे म्हणजे लांबवर पसरलेलं, पण छोटं गाव होतं. पुढे वांद्रेसह साष्टीचा सारा भाग मुंबईला जोडला गेला.
जुन्या वांद्र्याचा हा फोटो. वांद्र्यात सुरुवातीपासूनच रस्ते प्रशस्त आहेत. टुमदार बंगलेही या ठिकाणी आहेत.
स्टेशनच्या जवळचा भाग जो नवपारा (नौपाडा) म्हणून प्रसिद्ध होता, तिथं एका श्रीमंत कोकणी माणसानं बांधलेल्या तलावाला पुढे स्वामी विवेकानंद यांचं नाव दिलं गेलं. तिथं जुनं जरीमरी मातेचे मंदिर आहे. शेजारी श्री संत सेना नाभिक समाजाचे सभागृह, नॅशनल लायब्ररी आणि महात्मा गांधी सेवामंदिर सभागृह, लिंकिंग रोड, एल्को मार्केट, बँड स्टँड, पाली हिल आणि ख्रिस्ती मंडळींच्या शिक्षणसंस्था, चर्च आणि लीलावती हॉस्पिटल ही पश्चिमेची प्रमुख ठिकाणं. शिवाय अनेक लहान-मोठी व प्रसिद्ध पब, रेस्टॉरंटमुळे तिथं तरुणाई सतत दिसते. पूर्वेला स्टेशनजवळ वांद्रे टर्मिनस, हार्बर मार्गाचं स्टेशन, बेहराम पाडा आणि पुढे भारतनगर या मोठ्या झोपडपट्ट्या.
म्हाडाच्या वसाहतीत मराठी मंडळींची घरे, राजकारणी, कलाकार, साहित्यिक व पत्रकारांच्या वसाहती वा बंगले. वांद्रे-कुर्ला संकुलात खासगी व सरकारी कार्यालयांच्या चकचकीत इमारती, काही देशांचे दूतावास व पंचतारांकित हॉटेल्स. म्हाडा, महिला आयोग, वीज मंडळ, विवाह नोंदणी, सहकार उपनिबंधक, कुटुंब न्यायालय हे सारं पूर्वेला आहे. पश्चिम व पूर्वेला रोजगारासाठी रोज चार ते पाच लाख लोक स्टेशनवर उतरतात, असा अंदाज आहे.