कारागृहात फुलला भाजीचा मळा
By Admin | Published: November 7, 2015 10:15 PM2015-11-07T22:15:07+5:302015-11-07T22:42:04+5:30
न्यायाधिशांकडून कौतुक : विक्री केंद्राचा प्रारंभ
सावंतवाडी : कारागृहातील कैद्यांमध्ये कारागीर व प्रगतशील शेतकरी दडलेला आहे. त्यांच्या कलागुणांना कारागृह अधीक्षक व जेलर यांनी वाव देत कारागृह परिसरात आकर्षक असा भाजीचा मळा फुलविला. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश खलील भेंडवडे यांनी
केले.
सावंतवाडी येथील कारागृहात फुलविण्यात आलेली भाजी व तयार करण्यात आलेले आकाशकंदील यांच्या विक्रीकेंद्राचा प्रारंभ न्यायाधीश भेंडवडे यांच्या हस्ते झाला. यावेळी कारागृह अधीक्षक ए. एस. सदाफुले, सहाय्यक अधीक्षक हेमंत पाटील, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित
होते.
येथील कारागृहाच्या अर्ध्या एकर जमिनीत अधीक्षक ए. आर. सदाफुले व सहाय्यक अधीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील सर्व बंदिवानांनी एकत्रित येऊन आकर्षक असा फळभाज्यांचा मळा फुलवला. यामध्ये कारागृहातील कैद्यांमध्ये दडलेली कला बाहेर काढून त्यांच्याकडून दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तंूची निर्मिती करण्यात आली.
यामध्ये फुलभाज्यांबरोबरच झाडू, दिवाळी सणासाठी आकाशकंदील अशा विविध वस्तू बनविण्यात आल्या. या वस्तूंच्या विक्रीकरिता विक्री केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व वस्तू अल्पदरात लोकांना पुरविण्यात येणार आहे.
रोपवाटिका, बायोगॅसचा प्रकल्पही कारागृहात सुरू करण्याचा मानस काही दिवसात सुरू करण्यात येईल व बंदिवानांच्या कलेला वाव देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन कारागृह अधीक्षक ए. ए. सदाफुले यांनी केले. (वार्ताहर)