मुंबई : गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, भाजीपाल्याचे दर दुप्पट झाले आहेत, तर गवारने शंभरी गाठली आहे.
मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.
मेथी २५, शेपू २५, लालमठ २०, चवळी २०, कोथिंबीर २० रुपये जुडी मिळत आहे, तर फरसबी ८०, वाल ८० रुपये किलो मिळत आहे. शेवगा ८०, पडवळ, तोंडली ८०, मिरची ४०, ढोबळी मिरची ८०, टोमॅटो ३०, वाटाणा ८०, कोबी ६०, फ्लॉवर ८० रुपये किलो दराने मिळत आहे.
फळांच्या दरातही ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.
सफरचंद १६० रुपये, डाळिंब ११०, मोसंबी ५०, संत्री ८० रुपये प्रतिकिलो, तर केळी ४० रु. डझन, किवी ४ नग १००, चिकू ६० रुपयांना मिळत आहे. मोसंबी आणि संत्रीच्या दरात मोठी घट होऊन दर निम्म्यावर आले आहेत.
किराणा मालाचे दर ‘जैसे थे’ आहेत. मूगडाळ ११० ते १२०, तूरडाळ ९० ते १५०, मसूर डाळ ७० ते ८०, चनाडाळ ६० ते ८० रुपये किलो दराने मिळत आहे. सूर्यफूल, शेंगदाणा आणि पामतेलाचे दर जैसे थे आहेत.
भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आवक कमी झाली असून, त्या प्रमाणात मागणी जास्त आहे. त्यामुळे भाज्या महाग झाल्या आहेत.
सुनील, चव्हाण, भाजी विक्रेते
गेल्या काही दिवसांत भाजीपाला महाग झाला आहे. प्रत्येक भाजीमध्ये २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. पगार कमी झालेले आहेत. त्यातच भाजीपाला महाग झाला आहे. घर चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सुनंदा सोनवणे, ग्राहक
बाजारात तेलाचा तुटवडा आहे; परंतु सध्या तेलाचे भाव स्थिर आहेत. मात्र, तेलाचा तुटवडा कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत तेल दोन ते पाच रुपयांनी महाग होईल.
विनीत शाह, व्यापारी