भाजीपाल्याचे दर आले निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:18 AM2020-11-22T09:18:36+5:302020-11-22T09:18:36+5:30

नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक प्रचंड वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर निम्म्यावर आले आहेत. कोथिंबीर, ...

Vegetable prices halved | भाजीपाल्याचे दर आले निम्म्यावर

भाजीपाल्याचे दर आले निम्म्यावर

Next

नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक प्रचंड वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर निम्म्यावर आले आहेत. कोथिंबीर, कोबी, फ्लॉवरसह सर्व भाज्यांचे दर नियंत्रणात आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

बाजार समितीमध्ये प्रतिदिन ४५० ते ५०० वाहनांची आवक होत असते. शुक्रवारी तब्बल ५६० वाहनांची आवक झाली. मागणीच्या तुलनेमध्ये आवक जास्त असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. दुधी भोपळा २० ते २८ रुपये किलोवरून ८ ते १२ रुपये झाला आहे. कोबी २८ ते ३८ वरून १४ ते २०, फ्लॉवर २० ते २६ रुपयांवरून १० ते २० रुपये किलोवर आला आहे. फरसबी, गवार व वांगे यांच्या दरामध्येही मोठी घसरण झाली आहे. बाजारभाव निम्म्यावर आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. एपीएमसीमध्ये कोथिंबीरची मोठी जुडी १५ ते ४० वरून १० ते १५ रुपयांवर आली असून किरकोळ मार्केटमध्ये छोट्या जुड्या करून ५ रुपयांना विकल्या जात आहेत.

मुंबईमध्ये पुणे, नाशिक, सातारा व काही प्रमाणात इतर राज्यांतूनही भाजीपाल्याची आवक होत आहे. बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आवक अचानक वाढल्यामुळे दर कमी झाले आहेत. पुढील आठवडाभर भाजीपाला स्वस्तच मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

चौकट

कोथिंबीरला एक रुपया बाजारभाव

कोथिंबीरचे दर राज्यात सर्वत्र घसरले आहेत. पुणे बाजार समितीमध्ये शुक्रवारी विक्रमी ७९ हजार जुड्यांची आवक झाली असून १ ते ३ रुपये जुडी दराने विक्री झाली आहे. पंढरपूर बाजार समितीमध्ये १ ते ५ रुपये व मंगळवेढा बाजार समितीमध्ये १ ते ३ रुपये जुडी दराने कोथिंबीरची विक्री झाली. अकलूज, श्रीरामपूर, रत्नागिरी बाजार समितीमध्ये कोथिंबीर २ रुपये जुडी दराने विकली गेली.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दर

वस्तू २ नोव्हेंबर (एपीएमसी) २० नोव्हेंबर (एपीएमसी) २० नोव्हेंबर (किरकोळ)

कोबी २८ ते ३८ १४ ते २० ३० ते ४०

फ्लॉवर २० ते २६ १० ते २० ३० ते ४०

दुधी भोपळा २० ते २८ ८ ते १२ २० ते ३०

भेंडी २५ ते ४० १५ ते ३० ३० ते ४०

फरसबी ५५ ते ६५ ३० ते ४० ५० ते ६०

गवार ५० ते ५५ ४० ते ४५ ५० ते ६०

काकडी १० ते १६ ६ ते १० २५ ते ३०

वांगी २५ ते ४४ २० ते ३६ ५० ते ६०

Web Title: Vegetable prices halved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.