नवी मुंबई : राज्यात ओला दुष्काळ सुरू झाला असून, त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला आहे. मुंबईमध्ये कांद्यासह भाजीपाल्याची आवक घसरली असून, त्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. एक आठवड्यामध्ये कोथिंबिरीचे दर दुप्पट झाले आहेत. किरकोळ बाजारात गाजर, शेवगा शेंग व वाटाण्याचे दर प्रचंड वाढले आहेत.
पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २४ आॅक्टोबरला घाऊक बाजारात कोथिंबिरीची एक जुडी १५ ते ४० रुपये किलो दराने विकली जात होती. शुक्रवारी हे दर ३० ते १०० रुपयांवर गेले आहेत. बाजार समितीमधील एका जुडीच्या दोन किंवा तीन जुडी करून ती ४० ते ५० रुपये दराने विकली जात आहे. गाजराचे दरही २५ ते ३५ रुपयांवरून ३६ ते ४४ रुपयांवर गेले असून, किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. शेवगा शेंगेचे दर किरकोळ बाजारामध्ये १५० ते २०० रुपयांवर गेले आहेत. वाटाणा १५० ते १६० रुपये किलो दराने विकला जात आहे.
कांद्याचे दरही पुन्हा वाढू लागले आहेत. मुंबईमध्ये सद्यस्थितीमध्ये ७०० ते ८०० टन कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात एक आठवड्यापूर्वी कांदा ३३ ते ४० रुपये किलो दराने विकला जात होता. शुक्रवारी हे दर ३८ ते ४८ रुपये किलो असे झाले आहेत. किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये दराने विकला जात आहे. पावसामुळे नवीन पीक पुरेशा प्रमाणात बाजारात आले नाही. यामुळे कांद्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत.पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, बाजारामध्ये पुरेशी आवक होत नाही. मालाची कमतरता असल्यामुळे कांदा, गाजर, शेवगा शेंग, वाटाणा व इतर वस्तूंचे दर वाढू लागले आहे. आवक नियमित होईपर्यंत बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे. - बाबू घाग, भाजीविक्रेते.