मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले; ग्राहक चिंतित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 01:03 AM2019-01-30T01:03:26+5:302019-01-30T01:03:45+5:30
बाजार समितीमध्ये आवक घटली; कोथिंबिरीसह मेथी, शेपू महागली
नवी मुंबई : मुंबई बाजार समितीमध्ये काही दिवसांपासून आवक घसरू लागल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढू लागले आहेत. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दर वाढल्यामुळे ग्राहक चिंतेत असले, तरी चांगला भाव मिळू लागल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हिवाळ्यामध्ये बाजार समितीमध्ये रोज ६०० ते ७०० ट्रक व टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक होऊ लागली होती. यामुळे बाजारभाव कोसळले होते. वांगी, फ्लॉवरसह इतर वस्तूंची विक्री न झाल्यामुळे माल फेकून देण्याची वेळ आली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून आवक कमी झाली असल्याने बाजारभाव वाढू लागले आहेत. २१ जानेवारीला होलसेल मार्केटमध्ये ८ ते १८ रुपयांना कोथिंबीरची जुडी विकली जात होती. एक आठवड्यात हेच दर १५ ते ४० रुपये झाले आहेत. मेथीचे दर ८ ते १६ रुपयांवरून १० ते २० रुपये जुडी झाले आहेत. शेपूचे दर ८ ते १४ रुपयांवरून थेट १० ते २५ रुपये जुडी झाले आहेत.
दुधी भोपळ्याचे दर ८ ते १६ रुपये किलोवरून थेट १४ ते २४ रुपये झाले आहेत. फ्लॉवर, चवळी शेंग, फ्लॉवर, गाजर, गवार, घेवडा, शिराळी दोडका, टोमॅटो, वांगी, वाटाणा यांच्या दरामध्येही वाढ झाली आहे. राज्यभर दुष्काळी स्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागला आहे, यामुळे मार्केटमधील आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत आहेत. नाशीक, पुणे, सातारा, गुजरात, कर्नाटक येथून भाजीपाल्याची आवक होत आहे.
एक आठवड्यापासून आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव काही प्रमाणात वाढले आहेत. आवक सुरळीत झाली की भाव नियंत्रणात येतील.
- शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी
काही दिवसांपासून मार्केटमध्ये मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. एपीएमसीमध्ये माल कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे.
- बाबू घाग, किरकोळ विक्रेते, नेरूळ