मुंबईत भाज्यांचा भडका! सामान्यांना मनस्ताप, सणासुदीच्या काळात भाज्यांचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:54 AM2017-09-28T04:54:56+5:302017-09-28T04:55:00+5:30
ऐन सणासुदीच्या काळात शहरातील बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. सणासुदीच्या काळात भाजीपाल्याची सर्वत्र अधिक मागणी असते. मात्र, त्याच वेळेस भाजीपाल्यासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
- कुलदीप घायवट ।
मुंबई : ऐन सणासुदीच्या काळात शहरातील बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. सणासुदीच्या काळात भाजीपाल्याची सर्वत्र अधिक मागणी असते. मात्र, त्याच वेळेस भाजीपाल्यासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. भाजीपाल्याची बाजारात मोठी उलाढाल सुरू असून, खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. या आधीच वस्तू सेवा करामुळे ग्राहकांची होणारी ओढाताण, सणासुदीमुळे महागलेली बाजारपेठ, त्यात भर म्हणून भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीने ग्राहकांचा मनस्ताप दिवसेंदिवस वाढत आहे.
शहर-उपनगरातील भाजीबाजारात भाज्यांची आवक कमी झाली असून, त्यामुळे त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. भाज्यांच्या घाऊक बाजार आणि किरकोळ बाजारामधील किमतीत तब्बल २० ते ५0 टक्क्यांनी फरक जाणवतो आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भाजीचा माल जास्त विकला जात असला, तरी भाजीपाल्यांच्या अपुºया पुरवठ्याने भाज्यांच्या किमतीत वाढ झालेली आहे.
वाशी व दादर येथील घाऊक भाजी बाजारांतून, दादर, घाटकोपर, कुर्ला, चेंबूरसह शहरांमधील बाजारात भाजीपाला आणला जातो, तसेच काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसांमुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे, तर इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. या सर्व कारणांमुळे भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे विक्रत्यांकडून सांगण्यात आले.
भाज्यांची मागणी वाढल्याने, २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे विकली जाणारी कोथिंबीर आता ४० ते ५० रुपयांपर्यंत विकली जात आहे. घेवडा, दुधीभोपळा, कारले, गाजर, फरसबी यांची किंमत ६० ते ७० रुपयांपर्यंत आहे. चांगल्या प्रकारची लिंबे १० रुपयांना ५ मिळत आहेत. शेपू, पालक, कांद्याची पात जुडीप्रमाणे १० ते १५ रुपयांना विकली जात आहे. पुदिनादेखील १० ते १५ रुपयांना मिळत आहे. भुईमुगाच्या शेंगा ४० ते ५० किलो दराने विकल्या जात आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त अनेक जण उपवास करतात, त्यामुळे रताळ्याचे दरही वाढले असून, ते ४० ते ६० रुपये किलो असे आहेत.
भाज्यांची किंमत ही त्यांच्या दर्जावर अवलंबून आहे त्यामुळे जसा भाजीचा दर्जा तशी भाजीची किंमत ठरते. घाऊक बाजारात आलेल्या भाजीचा दर हा सकाळी वाढलेला असतो आणि संध्याकाळी कमी होतो, असे भाजीविक्रेता गणेश यादव याने सांगितले.
नुकतेच गॅस सिलिंडरचे दर वाढले, त्यामुळे प्रत्येक महिन्यात सामान्यांची कोंडी होत आहे. पण सणासुदीच्या वेळेस महागाई वाढल्याने आता आम्ही सण साजरे कसे करायचे, हाच प्रश्न सतावतो आहे. - रजनी कांबळे, अंधेरी
जीवनावश्यक भाज्यांच्या किमती वाढल्यामुळे आता खायचे काय, असा प्रश्न पडला आहे. सरकारने वायफळ निर्णय घेण्यापेक्षा महागाई कशी कमी होईल यावर लक्ष द्यावे.
- सविता मेंगळ, माटुंगा
भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत; तसेच रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे भाजीपाल्याचा दर्जा खालावलेला दिसून येत आहे. दिवसागणिक वाढणारी महागाई हेच ‘अच्छे दिन’ का, असा सवाल आमच्यासारख्या सामान्यांना पडला आहे.
- मनीषा शितोळे, कांजूरमार्ग