भाजी विक्रेत्याने हाणून पाडला चोरीचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 05:09 AM2019-08-06T05:09:27+5:302019-08-06T05:09:57+5:30
महिलेची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न, रिक्षावर झडप घेत चोरट्यांना पकडले
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षातून वृद्धेची सोनसाखळी चोरण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना एका भाजी विक्रेत्याने चांगलाच धडा शिकवला. चोरटे सोनसाखळी हिसकावत असतानाच, त्याने रिक्षावर झडप घालून चालकाला बाहेर खेचले. त्यानंतर, स्थानिकांच्या मदतीने दोन्ही चोरट्यांना बोरीवली पोलिसांच्या स्वाधीन केले.
गोल्डी राणा असे या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. बोरीवली पश्चिम परिसरात राहणाºया सुहासिनी जोशी (६७) या ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बाजारात निघाल्या होत्या. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या रिक्षातील प्रवासी सोसायटीकडे पाहून पत्ता विचारत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन ‘पत्ता शोधत आहात का?’ असे रिक्षाचालकाला विचारले. मात्र, त्याने जोशींना काहीच उत्तर दिले नाही आणि ‘तुम्हाला कुठे सोडू का?’ अशी विचारणा केली. तेव्हा त्याला नकार देत त्या पुढे चालू लागल्या.
त्याचदरम्यान ती रिक्षा त्यांच्या मागून आली आणि रिक्षातील एकाने जोशींच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला.
ही बाब रस्त्यावर भाजी विकत असलेल्या राणा याने पाहिली. रिक्षा त्याच्याजवळ येताच त्याने रिक्षावरच झडप घालत रिक्षाच्या चालकाला बाहेर खेचून काढले. रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने भाजी विक्रेत्याला धक्कबुक्की करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून आसपासचे लोक गोंधळले.
मागून जोशी या ‘चोर चोर’ ओरडत येताना दिसल्या. त्यामुळे चोरी झाल्याचे लक्षात येताच, आसपासच्या लोकांनी दोन्ही चोरांना पकडून चांगलाच चोप देत बोरीवली पोलिसांच्या स्वाधीन केले. विजय ढगे (३९) असे रिक्षाचालकाचे, तर सुभाष गवळी (४५) असे त्याच्या साथीदाराचे नाव असून, तो बिगारीकाम करतो. हे दोघेही चारकोप गाव येथील रहिवासी असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजी विक्रेत्याने जीवाची पर्वा न करता दाखविलेल्या या धाडसाप्रकरणी महिलेसह पोलिसांनी त्याचे कौतुक केले.