Join us

स्कूल बसमधून विकला जातोय भाजीपाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांवर अवलंबून असणाऱ्या स्कूल ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांवर अवलंबून असणाऱ्या स्कूल बस चालकांचे व मालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. मागील दोन वर्षांपासून सर्व स्कूल बस धूळखात उभ्या आहेत. अनेक बस चालकांनी मागील दोन वर्षे बसला हातही न लावल्यामुळे बसचे टायर पंक्चर झाले आहेत, बॅटरी पूर्णपणे उतरली आहे, सीटवर धुळीचे थर साचले आहेत, पार्टवर गंज चढत चालला आहे, तर अनेक बसमध्ये छोटी झाडे देखील उगवली आहेत.

एका बसवर चालक, क्लीनर, लेडी अटेंडंट, मेकॅनिक, स्पेअर पार्ट विक्रेते अशा सर्वांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील दोन वर्षांपासून स्कूल बस जागच्याजागी उभ्या असल्याने अनेकांनी दुसरीकडे नोकरीधंदे सुरू केले आहेत. अनेक जण आपल्या मूळ गावी जाऊन शेती करत आहेत. तर काही बस चालक व मालक भाजीपाला विकत आहेत यामुळे या सर्व परिस्थितीतून उभे राहण्यासाठी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्व बस चालक व मालक करत आहेत.

शहरातील एकूण शाळा - ५ हजार

एकूण स्कूल बस - १० हजार

गाडी दुरुस्त करण्यासाठी लाखो रुपये येणार खर्च

रमेश मनियान (स्कूलबस मालक) - संपूर्ण महाराष्ट्रात ६५ हजार स्कूल बस आहेत. यातील एक टक्के देखील स्कूलबस गेली दोन वर्ष रस्त्यावर धावल्या नाहीत. त्या जागच्या जागी उभ्या आहेत. मुंबईत प्रवासासाठी बेस्ट बसची संख्या कमी पडली म्हणून सरकारने एसटी सेवा सुरू केली. परंतु आम्ही त्यावेळी स्कूलबस मुंबईच्या रस्त्यावर चालू कराव्या यासाठी मागणी केली. स्कूल बस या एसटीच्या तुलनेत स्वच्छ असतात. परंतु सरकारने आमचे ऐकले नाही. असं असतानाही प्रशासनाने बेस्टच्या ताफ्यात नवीन गाड्या देखील खरेदी केल्या त्याची काहीच गरज नव्हती.

बबन क्षीरसागर (स्कूलबस मालक) - मुंबईसारख्या शहरात एका बसचे आयुष्य आठ वर्षे असते. आता त्यातली दोन वर्षे ही वाया गेली. या कठीण परिस्थितीत कोणीच आमच्या मागे उभे राहत नाही याला कंटाळून अनेक बस चालक व मालकांनी आत्महत्या देखील केल्या. आता येत्या दोन-तीन महिन्यात शाळा सुरू झाली तरीदेखील प्रत्येक बस पुन्हा सुरु करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार. दुरुस्ती, विमा, आरटीओ पासिंग याला खर्च आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊन देखील पुन्हा व्यवसाय जोर धरेल का यावर प्रश्नचिन्ह आहे या परिस्थितीत सावरायला एक वर्ष तरी जाणारच.

चालकांचे हाल वेगळेच!

गिरीराज ठाकूर : दोन वर्षे स्कूलबस वरील नोकरी सुटली. यामुळे मालकाने पगार देणे देखील बंद केले. म्हणून मधल्या काळात हाताला मिळेल ते काम करत होतो. कधी मिळेल त्या गाडीवर ड्रायव्हिंगचे काम केले. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मिळेल ते काम करावे लागते.

महेश पाटील : लॉकडाऊन लागल्यापासून हाताला काम धंदा नाही. त्यामुळे गावी शेती करत आहे. आता जोपर्यंत शाळा सुरू होत नाहीत तोपर्यंत शेतीच करणार.

(स्कूल बस फोटो )

लग्नाच्या वरातीचे अथवा पिकनिकचे भाडे आल्यास महिन्यातून दोन ते तीनवेळा बस रस्त्यावर धावते. अन्यथा या बस धूळ खात उभ्या आहेत.