मुंबई : सोमवारपासून सुरू असलेला भाजी व्यापाऱ्यांचा संप अखेर बुधवारी सायंकाळी मिटला असला, तरीही शहर आणि उपनगरातील मंडईमधील भाज्यांचे भाव गगनाला भिडलेलेच आहेत. भाज्यांच्या चढ्या भावाबाबत गृहिणींनी संताप व्यक्त केला असून, किमान संप मिटल्यानंतर तरी भाज्यांचे दर कमी करण्यात यावेत, अशी मागणी गृहिणींनी केली आहे.वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील व्यापारांनी संप पुकारला आणि त्याचा परिणाम शहर आणि उपनगरातील भाज्यांच्या दरांवर झाला. गेल्या काही दिवसांत भाज्यांचे भाव अधिक तेजीने वाढले आहेत. आधी टोमॅटोच्या चढ्या भावाने गृहिणी त्रस्त होत्या. त्यातच भाज्यांच्या भावामध्ये दुपटी, तिपटीने वाढ झाल्यामुळे, भाजी आता ताटातून बाहेर काढायची का? असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. बुधवारी सायंकाळी संप मागे घेण्यात आल्यानंतर गृहिणींनी सुटकेचा निश्वास सोडला, तरी अजूनही भाज्यांचे भाव चढेच पाहायला मिळाले. शिवाय, भाज्यांसोबतच फळबाजारही बंद असल्याने शहर आणि उपनगरातील फळांची आवक घटली होती. त्याचा परिणाम फळांच्या किमतीवरही झाला आहे. आता संप मिटल्यानंतर, गुरुवारपासून भाज्या रास्त दरात मिळतील, अशी आशा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.
संप मिटला तरी भाज्या महागच!
By admin | Published: July 14, 2016 2:24 AM