Join us

रानभाज्यांना मिळते खवय्यांची पसंती, आदिवासींना मिळते उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:10 AM

मुंबई : मश्रुम, कंकोळ, अळूची पाने, गावठी भेंडी, कारली, शिराळी, काकडी, टाकळ अशा ताज्या भाज्यांनी सध्या बोरिवली आणि परिसरातील ...

मुंबई : मश्रुम, कंकोळ, अळूची पाने, गावठी भेंडी, कारली, शिराळी, काकडी, टाकळ अशा ताज्या भाज्यांनी सध्या बोरिवली आणि परिसरातील बाजार फुलून गेलेेले दिसतात. नॅशनल पार्कच्या परिसरात राहणारे आदिवासी बांधव या रानभाज्या विक्रीसाठी आणतात. खवय्ये या भाज्यांच्या शोधात असतात.

मुंबईत साधारणपणे वसई, नाशिक येथून भाज्या येतात. पण बोरिवली आणि आसपासच्या भागातील लोकांना नॅशनल पार्कमधील ताज्या भाज्याही मिळतात. रानभाज्या विकणाऱ्या नेत्रा घरत यांनी सांगितले की, पावसाच्या दिवसात आमच्याकडील भाज्यांना चांगला भाव मिळतो. आरोग्यवर्धक असल्यामुळे ग्राहक आवर्जून या भाज्या बाजारामध्ये शोधत असतात. आम्ही अळूची पाने, मश्रुम यांना चांगली मागणी असते. दिवसाकाठी ७०० ते ८०० रुपये मिळतात.

वाकळी नावाची रानभाजी सर्दी-खोकल्यावर इलाज म्हणून वापरली जाते, पण रानभाज्या घेताना काळजी घ्यावी लागते. काही वेळा चुकीची भाजी अपायकारकही ठरू शकते. त्यामुळे माहितगारांकडूनही भाजी विकत घ्यावी, असा सल्ला दिला जातो.

कुपोषणावर मात करण्यासाठी आता रानभाज्यांचा वापर केला जातो. कॅल्शिअम, प्रोटीन यांचा चांगला पुरवठा या भाज्यांमधून होतो.

पावसाळ्यात साधारणपणे श्रावण सुरू झाला की बाजारात पालेभाज्या अणि जास्त करून रानभाजी भरपूर बघायला मिळते. अळंबी अळू टाकळा शेगला कनकोळ अशा रानातील भाज्या पावसात मिळतात इतर दिवसांपेक्षा या भाज्यांची मागणी या पावसात जास्त होते कारण ह्या फक्त ठराविक ऋतूमधे येणाऱ्या भाज्या असतात ज्याचा वापर आहारामध्ये करणे गरजेचे असते

- श्रद्धा पारकर

रानभाज्या लोकांनी अवश्य खाव्यात. चांगल्या ठिकाणी चांगल्या जागी मिळणाऱ्या रानभाज्या खाण अत्यंत आवश्यक आहे. जी गोष्ट हंगामी आहे ते खाण अधिक चांगल. रानभाज्यांमध्ये अत्यंत शरीराला आवश्यक असणारी पोषकद्रव्ये असतात. त्यामध्ये रक्तवाढ करणाऱ्या भाज्या असतील हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या भाज्या असतील हे सर्व आरोग्यवर्धक आहे. याचा आहारामध्ये समावेश करणं महत्त्वाचं आहे. चांगल्या ठिकाणी मिळणाऱ्या चांगल्या दर्जाच्या पोषक अशा रानभाज्या अवश्य खाव्यात.

- प्रतीक्षा कदम

( आहारतज्ज्ञ, तेरणा हॉस्पिटल)