भाजीपाला, धान्याचे भाव कडाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:23 AM2018-04-25T01:23:23+5:302018-04-25T01:23:23+5:30
डिझेल दरवाढीमुळे महागाई भडकणार; वाहतूक खर्चात वाढ
मुंबई : डिझेलचे दर लिटरला ७० रुपयांवर गेल्यामुळे वाहतूक खर्चात प्रति किमी सुमारे ४ रुपये वाढ झाली आहे. यामुळे भाजीपाला व धान्यांच्या किमती वाढून, प्रवासी भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात डिझेलवरील २५ लाख वाहने असून, त्यात २५ हजार खासगी प्रवासी बसेस आहेत. उरलेली वाहने टेम्पो, मिनी ट्रक व मोठे ट्रक्स आहेत. या वाहनांतून भाजीपाला, धान्य यांची वाहतूक होते. डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढला आहे.
किलोमागे किमान २ रुपये वाढ !
मालवाहतुकीसाठीच्या ट्रकची क्षमता २,००० ते ३,००० किलो असते. प्रति फेरी वाहतूक खर्चात २ हजार रुपयांची वाढ झाल्याने घाऊ क बाजारात भाजीपाला, फळे, धान्य किलोमागे किमान २ रुपयांनी महागण्याची भीती आहे.
मालवाहतुकीचा वाढता खर्च ग्राहकांवर पडणार
डिझेलचे दर ७० च्या वर गेले आहेत. महिनाभरातच डिझेल ७ रुपयांनी महागले आहे. व्यावसायिक वाहनांचा माइलेज ३ किमी ते ८ किमी प्रति लिटर असतो. मालवाहतूक करणाऱ्यांच्या खर्चात प्रति फेरी दीड हजार ते ३ हजार रुपये वाढ झाली आहे. हा खर्च ग्राहकांनाच सोसावा लागेल, असे महाराष्टÑ ट्रक व बस मालक असोसिएशनचे सचिव दयानंद नाटकर यांनी सांगितले.