मुंबई : आयआयटी बॉम्बेमध्ये सध्या शाकाहार व मांसाहार वाद रंगला आहे. येथील मांसाहारी व शाकाहारी पदार्थांचे सेवन करणा-या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची वेगवेगळी व्यवस्था असल्याचे सत्य समोर आले आहे. आयआयटीच्या वसतिगृह प्रशासनाने विद्यार्थ्यांना नुकत्याच पाठविलेल्या ईमेलमुळे हे प्रकरण उजेडात आले आहे.
आयआयटी वसतिगृहात शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे सेवन करणा-या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी ताटे ठेवण्यात आली आहेत. मात्र, शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी ठेवलेल्या ताटांचा वापर काही विद्यार्थी मांसाहार जेवणासाठी करत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत, आयआयटी वसतिगृह प्रशासनाने मांसाहार सेवन करणाºया विद्यार्थ्यांनी शाकाहारासाठी ठेवलेल्या ताटांचा वापर करू नये, असे फर्मान काढले. मात्र, शाकाहार व मांसाहार सेवनाचा विभाग वेगळा असताना कोणत्याही ताटात जेवले, तर त्यामुळे विशेष काय फरक पडतो?
असा सवाल उपस्थित करत, काही विद्यार्थ्यांनी या ईमेलवरच आक्षेप नोंदविला आहे. असा ईमेल करणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाच्या स्मरणपत्राविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुळात आधीपासून चुकीचा पायंडा पाडलेल्या प्रशासनाकडून टुकार नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात असल्याचा खरपूस समाचारकाही विद्यार्थ्यांनी घेतला आहे. यावर या रिमाइंडर ईमेलचा विद्यार्थ्यांनी गैरसमज करून घेतल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.मुळात आधीपासूनच स्वतंत्र विभाग असताना, एका विभागातील ताट दुसºया विभागात वापरण्यास मनाई आहे. तरीही नियमांचा भंग होत असल्याने, नियमाची आठवण करून देण्याचा प्रयत्न ईमेलमधून करण्यात आला आहे. दरम्यान, आयआयटी प्रशासनाच्या या ईमेलमुळे मुंबईमध्ये शाकाहार-मांसाहार वाद पुन्हा उफाळून आला आहे.