ठाणे : वाहनाची चोरी झाल्यास त्याची तक्रार करण्यासाठी यापुढे पोलीस ठाण्यात जावे लागणार नाही, तर त्याची तक्रार आता आॅनलाइन करता येणार आहे. यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. तक्रारदाराला एफआयआरची एक प्रत तत्काळ विनामूल्य मिळणार आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा गुन्हे तपासात वापर करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने वाहनचोरीची तक्रार आॅनलाइन करण्यासाठी ही नवी www.vahanchoritakarar.com वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, ठाणे शहर पोलिसांनी त्यांची वेबलिंक सुरू केली आहे. वाहनचोरी झाल्यास त्यावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. या लिंकवर जाऊन चोरीला गेलेल्या वाहनाची संपूर्ण माहिती भरायची आहे. वाहनचोरी ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाली आहे, त्याचा तपशील आणि चोरीचा घटनाक्रम नोंदवायचा आहे. तक्रार नोंदवली गेली की, मोबाइलवर एसएमएस येईल. पोलिसांच्या तपासामध्ये चोरीचे वाहन कोठे दिसले, इतरत्र कोठेही बेवारस वाहन सापडले किंवा एखाद्या गुन्ह्यात अथवा संशयास्पदरीत्या वाहन आढळले की, लगेचच एसएमएस पाठवून त्याची माहिती तक्रारदाराला कळवली जाणार आहे. (प्रतिनिधी)आॅनलाइन तक्रारीनंतरच लगेच सुरू होणार तपास वेबसाइटवर केलेली वाहनचोरीची तक्रार ही पोलिसांना तत्काळ माहितीसाठी व वाहनाचा शोध घेण्यासाठी उपलब्ध होईल. त्या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची पूर्वतयारी होईल. त्यानंतर, तक्रारदाराने पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआरच्या अहवालावर स्वाक्षरी केल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याचा क्रमांक दिला जाईल. त्यानंतर, त्याची एक प्रत तत्काळ विनामूल्य देण्यात येईल.
वाहनचोरीची तक्रार यापुढे आॅनलाइन
By admin | Published: June 12, 2016 1:03 AM