मुंबई : गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून वाहनविक्रीत मोठी घट होत असून, मंदीच्या या फटक्यामुळे अनेक डीलर्सना व्यवसायच बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हजारो जणांच्या नोकऱ्यांवरच कुºहाड चालली आहे. ही परिस्थिती लवकर न सुधारल्यास अनेक डीलर्स व्यवसाय बंद करतील आणि लाखो लोक नोकऱ्यांपासून वंचित होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.फेडरेशन आॅफ आॅटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या (एफएडीए) आकडेवारीनुसार, वाहनांची विक्री घटल्याने दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या तब्बल २७१ डीलर्सना व्यवसाय बंद करावा लागला. या व अशा अनेक डीलर्सकडे काम करणाºयांपैकी २५ ते ३५ हजार
लोकांना कामच नसल्याने घरी पाठवण्यात आले आहे. देशात २५ हजारांहून अधिक वाहनांचे शोरूम्स असून, त्यांत जवळपास २५ लाख लोक काम करतात. सध्या नोकरी गेलेल्यांची व व्यवसाय बंद करणाऱ्या डिलर्सची संख्या कमी असली तरी येत्या काळात मंदीचा फटका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. अनेकांनी कर्मचारी कपात सुरूच केली आहे. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार भारतातील वाहनविक्रीसाठी गेल्या दशकातील सर्वात घातक मंदीचा काळ आहे. नवीन नोंदणीची गती कमालीची मंदावली आहे. नव्या वाहनांच्या नोंदणीने गेल्या १८ महिन्यांचा नीचांक गाठला आहे.
एफएडीएचे उपाध्यक्ष आणि फरिदाबाद येथील महिंद्रा कारचे डिलर विंकेश गुलाटी म्हणाले की, गेल्या दिवाळीतही मंदीचे सावट होते. त्यानंतर तरी स्थिती सुधारेल अशी आशा होती, पण तसे झाले नाही. मंदी असल्याचे प्रत्यक्ष दिसू लागले आहे. व्यवसाय वाचविण्यासाठीखर्च कपात हाच उपाय वाहनांना खरेदी करण्यासाठी ग्राहकच नाहीत, अशा स्थितीत अतिरिक्त कर्मचारी ठेवून करायचे काय? त्यामुळे कर्मचारी कपात करण्यावर अनेक डिलर्स भर देऊ लागले आहेत. दर महिन्याला जपळपास ५ हजार लोकांच्या नोकऱ्यांवर संक्रांत येत आहे. अनेक डिलर्स मोठ्या व ऐसपैस शोरूमऐवजी छोट्या जागेत शिफ्ट होत आहेत, असेही गुलाटी म्हणाले.
वाहनांबाबतच्या सरकारच्या बदलत्या नियमांमुळे जनतेमध्ये संभ्रम आहे. बँकांनी वाहन कर्ज प्रकरणी नियम पूर्वीपेक्षा अधिक कठोर केले आहेत. बुडीत कर्जांचे प्रमाण वाढीस लागल्याने विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्ज देण्यास हात आखडता घेण्यात आला आहे. वाहन खरेदी करण्याऐवजी भाड्याने वापरण्याचा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. - अमितेश अग्रवाल, सीईओ, एक्सल आॅटो विस्टा, मुंबई