मुंबई : वाहनांवर असलेले थकीत २ हजार ९०० रुपयांचे चलन वाचविण्यासाठी एका ४२ वर्षीय व्यक्तीने वाहन क्रमांकात हेराफेरी केल्याचे वाहतूक पोलिसांच्या कारवाईत समोर आले. याप्रकरणी दादर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे.
दादर वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई राहुल पाटील (३२) यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. वीर सावरकर मार्ग येथे नाकाबंदी दरम्यान तपासणी सुरू असताना, एका चालकाच्या संशयास्पद हालचाली पथकाने हेरल्या. जयसिंग सोलंकी (४२) याला ताब्यात घेत वाहनांची तपासणी केली. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्याच्याकडे कागदपत्रे मिळून आली नाहीत. दुचाकी जप्त करत त्याला नोटीस देत दुसऱ्या दिवशी कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगितले. तो एल्फिन्स्टन येथील डिलाईल रोड परिसरात प्रभादेवी म्युनिसिपल चाळीत राहत असल्याचे सांगितले.
दुसऱ्या दिवशी हजर होताच, सादर केलेल्या कागदपत्रांपैकी आरसी बुक आणि गाडीवर लावण्यात आलेल्या नंबर प्लेटवरील क्रमांंकात बदल केल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर २ हजार ९०० रुपयांचे दंड असल्याचे दिसून आले. त्यानुसार, त्याने दंड चुकविण्यासाठी वाहन क्रमांकात बदल केल्याचे स्पष्ट होताच त्याच्याविरुद्ध दादर पोलिसांत तक्रार देण्यात आली.