Mumbai: HSRP नंबरप्लेटसाठी वाहनमालकांची होतेय दमछाक; कंत्राटदार, फिटमेंट सेंटरमध्ये समन्वयाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:55 IST2025-04-11T13:54:15+5:302025-04-11T13:55:11+5:30

Mumbai HSRP Application Issues: मुंबई महानगर प्रदेशात एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे कठीण होत आहे.

Vehicle owners are struggling for HSRP number plates Lack of coordination between contractors and fitment centers | Mumbai: HSRP नंबरप्लेटसाठी वाहनमालकांची होतेय दमछाक; कंत्राटदार, फिटमेंट सेंटरमध्ये समन्वयाचा अभाव

Mumbai: HSRP नंबरप्लेटसाठी वाहनमालकांची होतेय दमछाक; कंत्राटदार, फिटमेंट सेंटरमध्ये समन्वयाचा अभाव

मुंबई

राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) बसविण्याचा आदेश सरकारने काढला आहे. परंतु, मुंबई महानगर प्रदेशात एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे कठीण होत आहे. तसेच अपॉइंटमेंट मिळाली तरी नंबरप्लेट वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे काही वाहनमालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना फिटमेंट सेंटरच्या चकरा माराव्या लागत असून प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. 

भाईंदर येथे अनेक वाहनमालकांना बुकिंग करुनही एचएसआरपी नंबरप्लेट मिळत नाहीत. एजन्सीने पुरवलेल्या प्लेट्स वेळेवर केंद्रांवर पोहोचत नसल्याने फिटमेंट सेंटरवर वाहनचालकांना बराच वेळ वाट पाहावी लागते. सेंटरचालकांकडून अनेकदा त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगण्यात येते. एचएसआरपी बसविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मते अनेक फिटमेंट सेंटर्सवर प्लेट्स वेळेवर मिळत नाहीत. या गोंधळामुळे हजारो वाहनमालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्लेट्सचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्याबाबत शासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वाहनमालकांनी व्यक्त केले आहे. 

संबंधित फिटमेंट सेंटर नव्याने स्थापन झाले असल्याने प्लेट्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. तथापि ज्यांचे नंबरप्लेट बसविण्याचे राहिले होते. त्यांचे फिटमेट आता करण्यात आल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे. 
- विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त

पालघर परिसरात अपॉइंटमेंटसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मी पालघरहून भाईंदरला एचएसआरपी प्लेटसाठी आलो. पण इथे आल्यानंतरही एजन्सीने फिटिंग सेंटरला एचएसआरपी प्लेट पोहोचवली नसल्यामुळे मला एक दिवस उशिरा येण्यास सांगण्यात आले.
- महाकाय तारे, वाहनमालक

मी विरारमध्ये राहते, पण भाईंदरमध्ये अपॉइंटमेंट घेतली. कारण जवळपासचे ते एकमेव ठिकाण होते. तिथे १० दिवसांत स्लॉट उपलब्ध होता. पण जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा मला काही तासांनी येण्यास किंवा येण्यापूर्वी फोन करण्यास सांगण्यात आले. रोझेमार्टा एजन्सीकडून नंबरप्लेट वेळेवर पुरवल्या जात नव्हत्या, असे कारण देण्यात आले. 
- कविता सिंग, वाहनमालक

१० दिवस झाल्यानंतर प्लेट बसवण्याची वेळ दिली जाते. मात्र फिटमेंट सेंटरवर त्या दिवशी गेल्यानंतर अनेकांना हात हलवत परत यावे लागत आहे.

Web Title: Vehicle owners are struggling for HSRP number plates Lack of coordination between contractors and fitment centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.