‘फोनकॉल’मुळे वाहनचोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:09 AM2018-05-22T02:09:23+5:302018-05-22T02:09:23+5:30
‘गाडी धुण्यासाठी’ त्याने केलेल्या एका ‘फोनकॉल’मुळे त्याला पकडण्यात यश आले.
मुंबई : ‘ओएलएक्स’वर महागड्या गाड्यांच्या विक्रीसाठीची जाहिरात देणाऱ्या मालकांची फसवणूक करून, त्या लंपास करणाºया सराईत चोराच्या मुसक्या रविवारी आवळण्यात आल्या. बीकेसी पोलिसांनी ही कारवाई केली असून, ‘गाडी धुण्यासाठी’ त्याने केलेल्या एका ‘फोनकॉल’मुळे त्याला पकडण्यात यश आले.
मो. अयाज सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर कळंबोली, वांद्रे, ट्रॉम्बे, विक्रोळी आणि सानपाड्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही वर्षांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.
बीकेसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी खालिद शेख (३८) नामक व्यक्तीने त्यांची होंडा कंपनीची कार १ लाख ४० हजार रुपयांना विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात टाकली. तेव्हा अयाजने शेख यांना फोन करून ही कार विकत घेण्याची इच्छा दाखवत, त्यांना बीकेसीमध्ये व्यवहार करण्यासाठी बोलावले. सौदा पक्का करत एनईएफटीमार्फत पैसे बँक खात्यात जमा केल्याचा खोटा मेसेज त्याने शेख यांना दाखविला. त्याच्यावर विश्वास ठेवत, शेख यांनी गाडीची कागदपत्रे आणि चावी अयाजला दिली. मात्र, त्यानंतर बँकेत पैसे जमा झालेच नसल्याचे शेख यांना समजले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीकेसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप खानविलकर, पोलीस उपनिरीक्षक अमित उत्तेकर, गणेश तोडकर, नवनाथ काळे, अंमलदार ठाकरे, कडलग, ठोंबरे आणि यादव यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासादरम्यान त्यांनी अयाजचा सीडीआर पडताळून पहिला, ज्यात त्यांना एका सुरक्षा रक्षकाचा नंबर मिळाला. हा सुरक्षारक्षक अयाजची गाडी धुवायचा. तो नंबर अयाज निव्वळ ग्राहकांना फसवणूक करण्यासाठीच वापरायचा. मात्र, एक दिवस त्याने त्याच्या नंबरवरून संबंधित सुरक्षा रक्षकाला गाडी धुण्याबाबत सांगण्यासाठी फोन केला होता, जी त्याची चूक ठरली.
तपास अधिकाºयांनी त्या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले. त्याच्याच चौकशीतून अयाज हा खारघर येथे लपला असल्याचे पोलिसांना समजले आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
त्याच्याकडून बीएमडब्लू, फॉक्सवॅगन, सुझुकी, ह्युंदाईसारख्या सात महागड्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारमध्ये खालिद शेख यांच्या कारचादेखील समावेश आहे.