एकूण प्रदूषणात २५ टक्के वाटा
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणात दिवसागणिक वाढ होत असून, वायू प्रदूषणाबाबत अभ्यास करणाऱ्या वातावरण फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईची बिघडलेली हवा आजही तशीच आहे. माझगाव, मालाड, बोरिवली, अंधेरी आणि चेंबूर परिसरात सातत्याने हवा प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. विशेषतः शहरांमधील हवेचा स्तर दिवसेंदिवस घसरत आहे. दुसरीकडे एकूण प्रदूषणापैकी २५ टक्के वाटा हा वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आहे. हे रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे साेबतच हरित ऊर्जेकडे वळावे लागेल.
लॉकडाऊनमुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारला होता. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच हवेच्या गुणवत्तेचा दर्जा पुन्हा खालावू लागला. अवकाळी पाऊस, वाढलेली थंडी आणि ढगाळ वातावरण अशा हवामान बदलाने मुंबई प्रदूषित नोंदविण्यात आली. मार्च महिन्यातही सर्वसाधारण हीच परिस्थिती आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे प्रदूषणात भर पडली आहे. बंद कारखाने, उद्योग पुन्हा सुरू झाले असून, इमारतींच्या निर्माणाधीन कामांनी वेग पकडला आहे. बांधकामातून उठणारी धूळ वातावरणात पसरत आहे आणि मुंबई प्रदूषित होत आहे.
* बीकेसी, चेंबूर, कुर्ला, पनवेलमधील हवा प्रदूषित
अभ्यासाअंती पीएम २.५ (पार्टीक्युलेट मॅटर पोल्यूटंट) या कणांची पातळी सकाळच्या वेळेत सर्वाधिक असल्याचे आढळून आले. बीकेसी, चेंबूर, कुर्ला, खारघर, तळोजा, पनवेल येथील हवा प्रदूषित आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार पीएम २.५ खूप सूक्ष्म असतात. सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरतात. या प्रदूषकांमुळे वारंवार फुप्फुसांचा संसर्ग, दमा, दीर्घकाळ टिकणारे श्वसन संस्थेचे आजार आणि वृद्धांमध्ये हृदयविकार संभवतात.
* प्रदूषणाने असे घेतले बळी
- २०१९ साली देशभरात प्रदूषणामुळे तब्बल १७ लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचे लान्सेंट हेल्थ जर्नलमध्ये नमूद आहे. देशभरातील १७ लाख नागरिकांच्या मृत्यूचे टक्केवारीतील हे प्रमाण १७.८ आहे.
* आरोग्याला काय त्रास होतो?
- कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असेल तर ताे श्वासातून शोषला जातो. त्याची रक्तातील पातळी वाढली तर लोह तयार करण्याची क्षमता कमी होते. ऑक्सिजन पातळी खालावून चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे, डोक्याचा मानेखालील भाग दुखत राहण्याचा त्रास वाढतो. प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते. सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ होते.
* प्रदूषित घटकांमध्ये वाढ
- भारताच्या लोकसंख्येपैकी एकचतुर्थांश हिस्सा प्रदूषणाला तोंड देत आहे.
- हवेतील प्रदूषित घटकांमध्ये वाढ होण्याचा वेग ४२ टक्के आहे.
- मुंबईतील वायू प्रदूषणातील सुमारे एकतृतीयांश प्रदूषण शहरी सीमांबाहेरील घटकांमुळे होत आहे.
-------------