Join us

वाहनांमुळे काेंडला मुंबई महानगर प्रदेशचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:02 AM

एकूण प्रदूषणात २५ टक्के वाटा वाहनांचाइलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याशिवाय महानगरांमधील हवेचे प्रदूषण रोखता येणार नाहीसचिन लुंगसेलोकमत ...

एकूण प्रदूषणात २५ टक्के वाटा वाहनांचा

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याशिवाय महानगरांमधील हवेचे प्रदूषण रोखता येणार नाही

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणात दिवसागणिक वाढ होत असून, वायू प्रदूषणाबाबत अभ्यास करणाऱ्या वातावरण फाउण्डेशनच्या म्हणण्यानुसार, नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईची बिघडलेली हवा आजही तशीच आहे. माझगाव, मालाड, बोरीवली, अंधेरी आणि चेंबूर परिसरात सातत्याने हवा प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. विशेषतः शहरांमधील हवेचा स्तर दिवसेंदिवस घसरत आहे. दुसरीकडे एकूण प्रदूषणापैकी २५ टक्के वाटा हा वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आहे. हे रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे साेबतच हरित ऊर्जेकडे वळावे लागेल.

लॉकडाऊनमुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारला होता. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच हवेच्या गुणवत्तेचा दर्जा पुन्हा खालावू लागला. जानेवारी सुरू होतानाच मुंबईची हवा प्रदूषित नोंदविण्यात आली होती. त्यानंतर अवकाळी पाऊस, वाढलेली थंडी आणि ढगाळ वातावरण अशा हवामान बदलाने मुंबई प्रदूषित नोंदविण्यात आली. मार्च महिन्यातही सर्वसाधारण हीच परिस्थिती आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे प्रदूषणात भर पडली आहे. याशिवाय बंद कारखाने, उद्योग, बांधकामे पुन्हा सुरू झाले असून, इमारतींच्या निर्माणाधीन कामांनी वेग पकडला आहे. बांधकामातून उठणारी धूळ वातावरणात पसरत आहे आणि मुंबई प्रदूषित होत आहे.

* कुठे आहे हवा प्रदूषित

एका अभ्यासाअंती पीएम २.५ (पार्टीक्युलेट मॅटर पोल्यूटंट) या कणांची पातळी सकाळच्या वेळेत सर्वाधिक असल्याचे आढळून आले. बीकेसी, चेंबूर, कुर्ला, खारघर, तळोजा, पनवेल येथील हवा प्रदूषित आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार पीएम २.५ खूप सूक्ष्म असतात. सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरतात. या प्रदूषकांमुळे वारंवार फुप्फुसांचा संसर्ग, दमा, दीर्घकाळ टिकणारे श्वसन संस्थेचे आजार आणि वृद्धांमध्ये हृदयविकार संभवतात.

* वातावरणातील बदलाचा परिणाम

जगात उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळला किंवा तापमानात बदल झाला तरच त्याला आपण हवामानातील बदलाचे परिणाम असल्याचे म्हणतो; पण आपल्याकडे येणारे महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळे हेसुद्धा वातावरणातील बदलाचेच परिणाम आहेत. पुढील पाच वर्षांत राज्यात इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना दिली जाणार आहे.

* ३० टक्के इलेक्ट्रिक बस

पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित ऊर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येणार आहे. राज्यातील महामार्गावर सौरऊर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षांत साधारण ३० टक्के इलेक्ट्रिक बस आणणे यासह विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येणार आहे. हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने शासनामार्फत इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काळात प्रोत्साहन दिले जाणार आहे.

-------------

काय करावे लागेल

- उद्योगक्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी वायू प्रदूषक उत्सर्जकांशी संबंधित नियम आखणे

- कमी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांसाठी जिल्हावार धोरण निश्चित करणे

- औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे

- अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे

- सध्याची वाहने सोडून विजेवर आधारित वाहनांकडे वळणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहनपर मदत करणे

- सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे

- वाहनांचा सामूहिक वापर वाढवून रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करणे

- नगरविकासाचे नियोजन करताना सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना प्रोत्साहनपर योजना राबवणे

- धूळ आणि उष्णतेचे नियमन करण्यासाठी शहरांमधील हरित आच्छादन वाढवणे

* प्रदूषणाने असे घेतले बळी

- २०१९ साली देशभरात प्रदूषणामुळे तब्बल १७ लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचे लान्सेंट हेल्थ जर्नलमध्ये नमूद आहे.

- देशभरातील १७ लाख नागरिकांच्या मृत्यूचे टक्केवारीतील हे प्रमाण १७.८ आहे.

- खुल्या जागेवरील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या प्रदूषणामुळे नऊ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

- बंदिस्त जागेतील प्रदूषणामुळे सहा लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

- १९९० पासून २०१९ सालचा विचार करता बंदिस्त जागेतील प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे ६४.२ टक्क्यांनी घटले आहे.

- बाहेरील प्रदूषणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे ११५.३ टक्क्यांनी वाढले आहे.

* आरोग्याला काय त्रास होतो?

- कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असेल तर ताे श्वासातून शोषला जातो.

- त्याची रक्तातील पातळी वाढली तर लोह तयार करण्याची क्षमता कमी होते.

- ऑक्सिजन पातळी खालावून चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे, डोक्याचा मानेखालील भाग दुखत राहण्याचा त्रास वाढतो.

- प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते.

- सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ होते.

* प्रदूषित घटकांमध्ये वाढ

- भारताच्या लोकसंख्येपैकी एकचतुर्थांश हिस्सा प्रदूषणाला तोंड देत आहे.

- हवेतील प्रदूषित घटकांमध्ये वाढ होण्याचा वेग ४२ टक्के आहे.

- ८४ टक्के नागरिक राहत असलेल्या परिसरांनी वायू प्रदूषणाचे मापदंड केव्हाच ओलांडले आहेत.

- मुंबईतील वायू प्रदूषणातील सुमारे एकतृतीयांश प्रदूषण शहरी सीमांबाहेरील घटकांमुळे होत आहे.

-------------