Join us

सायन उड्डाणपूल बंद असल्याने वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 06:07 IST

दुरुस्ती काम सुरू; पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे चालकांमध्ये नाराजी

मुंबई : सायन उड्डाणपूल दुरुस्ती कामासाठी १४ ते १७ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी तसेच संध्याकाळी सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक वाहनचालकांनी वडाळ्याचा पर्याय निवडला. सायंकाळी वडाळा शांतीनगरपासून बरकत अली नाका ते वडाळा चर्चपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.

माटुंगा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी सांगितले की, पूल बंद असल्याने काही प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. ती सुरळीत करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. पूर्वी एका अधिकाऱ्यासह पाच जण वाहतूक नियोजन करत होते. आता सायन पूल बंद असल्यामुळे वाहतूककोंडी होऊ नये यासाठी २० पोलीस आणि १० वॉर्डन वाहतूक नियोजनासाठी नेमण्यात आले आहेत.

पूल बंद झाल्यामुळे इस्टर्न एक्स्प्रेस वेवर थोडी गर्दी वाढली आहे. इतर ठिकाणी त्याचा फारसा परिणाम नाही, असे चेंबूर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण तेजाळे यांनी सांगितले. तर, शांतीनगर, बरकत अली आदी परिसरात संध्याकाळी नेहमीच वाहनांची गर्दी होते. आता सायन उड्डाणपूल बंद असल्याने पूर्वीपेक्षाही जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे नियोजन केले आहे.

गर्दी वाढल्यास मनुष्यबळ वाढवून वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे वडाळा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड म्हणाले.वाहनचालक निखिल शिर्के यांच्या मते चेंबूरवरून येताना किंवा सायनवरून जाताना पर्यायी मार्गाची व्यवस्था केली असती तर वाहतूककोंडी कमी झाली असती. तर, पुलाचे चार गाळे (स्पॅम) शुक्रवारी काढण्यात आले. पूल दुरुस्तीवेळी एकूण २२ गाळ्यांचे काम करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले.

टॅग्स :वाहतूक कोंडीपोलिस