एसटी कामगार संघटना; अन्यथा आंदाेलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळ खाजगी वाहतूकदारांकडून प्रवासी वाहतुकीसाठी सुमारे ५०० साध्या गाड्या (लालपरी) भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्याला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने विरोध केला आहे.
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, एसटी महामंडळ खासगी वाहतूकदारांकडून प्रवासी वाहतुकीसाठी सुमारे ५०० साध्या गाड्या (लालपरी) भाडेतत्त्वावर घेणार असल्याचे समजते. खासगी वाहतूकदारांच्या बसला नियमित देखभालीसाठी व दुरुस्तीसाठी लागणारे सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा निश्चित करून त्या जागेचा नकाशा व क्षेत्रफळ यांची माहिती ४८ तासांत तातडीने सादर करण्याच्या लेखी सूचना मध्यवर्ती कार्यालयाने दिल्या आहेत. याशिवाय ३०० ते ४०० व त्यापेक्षा जास्त किमी अंतराच्या सध्या रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची माहितीही मध्यवर्ती कार्यालयाने मागितली आहे. खाजगी गाड्यांचे पार्किंग व मेंटेनन्ससाठी महामंडळाच्या मालकीच्या जागा देणे तसेच जास्त उत्पन्न आणणारे महामंडळाचे मार्गही खासगी वाहतूकदारांना देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वी भाडेतत्त्वावरील शिवशाही बसला जास्त उत्पन्नाचे मार्ग दिले आहेत, त्याचीच पुनरावृत्ती आता केली जात असून ही बाब खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देणारी आहे.
राज्यात पूर्वी खासगी वाहतूकदारांकडून प्रवासी वाहतूक केली जात होती, त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही बंधने नसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांची सुरक्षितता धोक्यात आली. त्यातूनच प्रवाशांच्या मागणीनुसार एसटीचे राष्ट्रीयीकरण झाले. राष्ट्रीयीकरण झाल्यावर जनतेला वेळेवर, माफक दरात व सुरक्षित सेवा मिळाली. आजही राज्यातील जनतेचा एसटीवर विश्वास आहे. राज्याच्या विकासामध्ये एसटीचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर गाड्या घेऊन सामान्य जनतेला पुन्हा असुरक्षित खासगी वाहतुकीकडे घेऊन जाणे चुकीचे आहे. साध्या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यास संघटनेचा विरोध आहे. तरीही महामंडळाने तसा निर्णय घेतल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला.
.................................