लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्फाेटक कार प्रकरणाचा तपास करीत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने सोमवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालयात छापेमारी केली. अशात, मुंबई पोलिसांकडूनही सचिन वाझेंनी वापरलेल्या वाहनांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारातून ये-जा करणाऱ्या खासगी वाहनांची नोंद करण्यात येते. मात्र, अनेकदा ओळखीचा अधिकारी खासगी वाहनातून आल्यानंतर त्याची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे वाझेंनी किती वाहने वापरली याची नोंद पोलिसांकडे नाही, तर दुसरीकडे पोलीस आयुक्तालयात दोन्ही प्रवेशद्वारांवर नजर ठेवण्यासाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याने ते सीसीटीव्ही फुटेज एनआयएला सापडले नव्हते. मात्र, एनआयएच्या पथकाने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातून काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचे समजते.
मुंबई पोलिसांनी अन्य माहितीच्या आधारे वाझेंनी वापरलेल्या वाहनांची माहिती घेत तपासणी सुरू केली आहे, तसेच खात्याअंतर्गतही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.