Join us

पदपथावर विक्रेत्यांचेच राज्य, गर्दीमुळे पादचार्‍यांना त्रास; फेरीवाल्यांचा परिसराला विळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 4:11 AM

Mumbai News : लॉकडाऊनमध्ये हे अनधिकृत फेरीवाले व विक्रेते आपापल्या गावी निघून गेल्याने फुटपाथ चालण्यासाठी मोकळे झाले होते. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने फुटपाथ पुन्हा एकदा अनधिकृत फेरीवाले तसेच विक्रेत्यांनी भरून गेले आहेत.

मुंबई : मुंबईतील गर्दीचे परिसर असणाऱ्या ठिकाणी फुटपाथवर पुन्हा एकदा अनधिकृत फेरीवाले तसेच विक्रेत्यांनी आपले ठाण मांडले आहे. लॉकडाऊनमध्ये हे अनधिकृत फेरीवाले व विक्रेते आपापल्या गावी निघून गेल्याने फुटपाथ चालण्यासाठी मोकळे झाले होते. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने फुटपाथ पुन्हा एकदा अनधिकृत फेरीवाले तसेच विक्रेत्यांनी भरून गेले आहेत. या विक्रेत्यांमुळे फुटपाथवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. चालण्यासाठी असणाऱ्या फूटपाथवर या फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने पादचार्‍यांना नेमके चालायचे कुठून हा प्रश्न पडत आहे. मुंबईतील दादर, परळ, सायन, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर, वांद्रे व अंधेरी ही मुख्य वर्दळीची ठिकाणे आहेत. मुंबईतील मध्य हार्बर व पश्चिम रेल्वेस्थानकांलगत असणाऱ्या रस्त्यांवर मुख्यतः फेरीवाल्यांचे प्रमाण अधिक दिसत आहे. या रस्त्यांवरील फुटपाथ नेहमी विक्रेत्यांनी गजबजलेले असल्याने पादचार्‍यांना नाइलाजाने रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी गर्दीमुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत नियम व अटी शिथिल केल्या असल्या तरीही  कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली गेल्याने ही गर्दी कोरोनाच्या संसर्गाला कारणीभूत ठरणार नाही ना, असा सवाल येथे उपस्थित होत आहे.  फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र कारवाई करूनही हे फेरीवाले पुन्हा त्या जागी ठाण मांडतात. हे फेरीवाले फुटपाथवरील आपली जागा सोडत नसल्याने यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

कोरोना संसर्गाचा धोकाया अनधिकृत फेरीवाल्यांमुळे फुटपाथवर तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. संध्याकाळच्या वेळेस या गर्दीचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा फेरीवाल्यांच्या तसेच काही ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क नसतो. तर या गर्दीमुळे एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जात नाही.  

स्वस्त मिळते म्हणून गर्दीअनेकदा ब्रँडेड शोरूममध्ये विक्रीस असणाऱ्या महागड्या वस्तूंची फर्स्ट कॉपी फुटपाथवर उपलब्ध असते. त्यामुळे ग्राहक ब्रँडेड वस्तूंच्या शोरूममध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा फुटपाथवरील स्वस्त दरात मिळणारी वस्तू खरेदी करतो.

टॅग्स :मुंबईबाजार