वेंकटेश शेट्टीने मारली बाजी
By admin | Published: July 3, 2017 06:53 AM2017-07-03T06:53:01+5:302017-07-03T06:53:01+5:30
मुंबईकर वेंकटेश शेट्टी याने अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करताना कसलेल्या रायडर्सना मागे टाकत मान्सून स्कूटर रॅलीच्या विजेतेपदाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकर वेंकटेश शेट्टी याने अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करताना कसलेल्या रायडर्सना मागे टाकत मान्सून स्कूटर रॅलीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. लॉरेन्स रेसिंगचे प्रतिनिधित्व करताना वेंकटेशने सर्वात कमी वेळेत अडथळे पार करत लक्ष वेधले. त्याचवेळी वेंकटेशच्या धडाक्यापुढे गतविजेता सय्यद आसिफ अली, शमीम खान, रुस्तम पटेल, मनजीत सिंग आणि अवतार सिंग या कसलेल्या रायडर्सना जेतेपदाने हुलकावणी दिली.
नवी मुंबईत झालेल्या या लोकप्रिय रॅलीमध्ये देशभरातील ५४ रायडर्सनी सहभाग नोंदवला होता. ३५ किमी अंतराच्या आखण्यात आलेल्या विशेष रॅली मार्गावर वेंकटेशने चिखल - खड्ड्यांचा अडथळा यशस्वीपणे पार करताना २५ मिनिटे १५ सेकंदाची विजयी वेळ नोंदवली. पुण्याच्या पिंकेश ठक्कर यानेही आपली छाप पाडताना २५ मिनिटे ४३ सेकंदाची वेळ नोंदवत उपविजेतेपद पटकावले. त्याचवेळी, वेंकटेश व पिंकेशच्या वर्चस्वापुढे गतविजेत्या सय्यदला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. सय्यदने २५ मिनिटे ४४ सेकंदाची वेळ देत रॅली पूर्ण केली.
वेंकटेशने रॅलीच्या ‘क’ गटातही (८० - १६० सीसी) वर्चस्व राखताना दुहेरी जेतेपदाची नोंद केली. याच गटात पिंकेशने द्वितीय क्रमांक मिळवला, तर सय्यदने तिसरे स्थान मिळवले. दरम्यान, पहिल्यांदाच या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या रायडर्ससाठी ठेवलेल्या विशेष पुरस्कारावर कोल्हापूरच्या अनिकेत कोरगावकरने कब्जा केला. त्याने ३२ मिनिटे २७ सेकंदांची वेळ देत बाजी मारली. रुस्तम पटेल आणि विक्रम बोपराई यांनी अनुक्रमे मुंबई व ठाणे - नवी मुंबईचा सर्वोत्तम रायडर म्हणून मान मिळवला.
महिलांचीही छाप...
या रॅलीमध्ये महिलांनीही सहभाग घेताना आपली चमक दाखवली. निधी शुक्ला आणि प्रिया गाला या मुंबईकरांनी महिला गटात पुरस्कार पटकावताना अनुक्रमे पहिल्या दोन स्थानांवर कब्जा केला. निधीने ३७ मिनिटे १३ सेकंद, तर प्रियाने ४२ मिनिटे १९ सेकंदांची वेळ देत रॅली पूर्ण केली.