महापालिका मुख्यालयात येणार व्हेंटिलेटर, ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 04:30 AM2020-08-02T04:30:42+5:302020-08-02T04:30:53+5:30
कर्मचाऱ्याचा मृत्यू । प्रशासनाला आली जाग
मुंबई : रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महापालिका मुख्यालयाच्या चिटणीस कार्यालयातील एका कर्मचाºयाचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. मुख्यालयात हजारोंच्या संख्येने कर्मचारी-अधिकारी काम करीत असताना साध्या रुग्णवाहिकेची व्यवस्था नसावी, यावर टीका होत आहे. याची गंभीर दखल घेत व्हेंटिलेटर, आॅक्सिजन सुविधेसह दोन रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पालिका मुख्यालयाच्या चिटणीस कार्यालयातील संबंधित कर्मचारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यालयात काम करीत होता. कामावर असतानाच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याबाबत आपत्कालीन विभागाला कळविल्यानंतरही रुग्णवाहिका येण्यास अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला. हा विलंब त्यांच्या जीवावर बेतला असा आरोप होत आहे. रुग्णवाहिकेतून पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. पालिका मुख्यालयात आयुक्त आणि महापौर यांचे दालन आहे, तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विविध समित्यांचे अध्यक्ष आदींचे कार्यालयेही आहेत. येथे दररोज हजारोंच्या संख्येने कर्मचारी, अधिकारी व नागरिक येत असतात.
त्यामुळे अशी एखादी घटना घडल्यास तत्काळ उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका असणे अपेक्षित आहे. याची दखल घेऊन मुख्यालयातील दवाखान्यात अद्ययावत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
पालिका मुख्यालयातील दवाखान्यात सध्या दोनच डॉक्टर असून यात एक आयुर्वेदिक व एक अॅलोपॅथी आहे. येथे कर्मचाऱ्यांच्या किरकोळ आजारावर उपचार केले जातात. त्यामुळे या ठिकाणी अद्ययावत सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात होती. याबाबत शनिवारी चर्चा झाल्यानंतर आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुख्यालय परिसरात व्हेंटिलेटर, आॅक्सिजन, दोन रुग्णवाहिका ठेवण्याचे आदेश अधिकाºयांना दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
पालिका मुख्यालयाच्या चिटणीस कार्यालयातील संबंधित कर्मचारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यालयात काम करीत होता.
एखादी घटना घडल्यास तत्काळ उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका असणे अपेक्षित आहे.