Join us

वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय कर्जप्रकरणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 5:51 AM

व्हिडीओकॉनला दिलेल्या ३,२५० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात सीबीआयने कंपनीचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : व्हिडीओकॉन कंपनीला दिलेल्या ३,२५० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात सीबीआयने सोमवारी व्हिडीओकॉन कंपनीचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक केली. याप्रकरणी तीनच दिवसांपूर्वी आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे. 

आयसीआयसीआयच्या प्रमुखपदी असताना चंदा कोचर यांनी २००९ ते २०१२ या कालावधीमध्ये व्हिडीओकॉन कंपनीची सहा कर्जप्रकरणे मंजूर करत एकूण ३२५० कोटींचे कर्ज दिले. यापैकी ६४ कोटी धूत यांनी न्यूपॉवर रिन्यूएबल्स प्रा. लि. कंपनीत वळविल्याचा ठपका आहे. न्यूपॉवर रिन्यूएबल्स प्रा. लि. या कंपनीत दीपक कोचर यांची ५० टक्क्यांची भागीदारी होती. कंपनीचे पहिले संचालक दीपक कोचर, वेणुगोपाल धूत आणि सौरभ धूत हे तिघे होते. २००९ मध्ये वेणुगोपाल धूत व सौरभ धूत यांनी या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. २०१९ मध्ये कोचर दाम्पत्य व धूत यांच्यासह व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लि., न्यूपॉवर रिन्यूएबल्स, व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लि. सुप्रीम एनर्जी प्रा. लि. यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :आयसीआयसीआय बँकगुन्हा अन्वेषण विभाग