व्हीडिओकॉन प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयसीआयसीआय व व्हिडिओकॉन आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत यांचा जामीन शुक्रवारी मंजूर करण्यात आला. यावेळी ते विशेष पीएमएलए न्यायालयात उपस्थित होते.
विशेष न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर धूत शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहिले. विशेष न्या. ए. ए. नांदगावकर यांनी धूत यांची ५ लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. त्यांना देश न सोडण्याचे व पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले. ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितल्यावर धूत यांना त्यांच्या कार्यालयात जावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
३० जानेवारी रोजी आयसीआयसीआयच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांना न्यायालयाने समन्स बजावले होते. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर चंदा कोचर यांचा जामीन मंजूर करण्यात आला. ईडीने दीपक कोचर यांना सप्टेंबर २०२० मध्ये अटक केली. सीबीआयने चंदा कोचर, दीपक कोचर आणि धूत यांच्याविरोधात गुन्हा नोंदविल्यावर ईडीनेही या सर्वांवर गुन्हा दाखल केला.
आयसीआय बँकेच्या सीईओ असताना चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉनला ३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. कर्ज मंजूर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हिडिओकॉनच्या न्यूपॉवर रिन्यूअल प्रा. लि. च्या बँक खात्यात ६४ कोटी रुपये जमा करण्यात आले. ही कंपनी दीपक कोचर यांच्या मालकीची आहे, असा तपास यंत्रणेचा दावा आहे.
........................