Join us  

फेरीवाला कारवाईप्रकरणी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक

By admin | Published: June 04, 2017 3:19 AM

के पश्चिम विभागातील फेरीवाल्यांच्या कारवाईसंदर्भात नुकत्याच झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा भाजपाविरोधात शिवसेना आणि काँग्रेस असे चित्र पाहण्यास मिळाले.

- मनोहर कुंभेजकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : के पश्चिम विभागातील फेरीवाल्यांच्या कारवाईसंदर्भात नुकत्याच झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा भाजपाविरोधात शिवसेना आणि काँग्रेस असे चित्र पाहण्यास मिळाले. फेरीवाल्यांवर कारवाई का केली, म्हणून शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी हरकतीचा मुद्दा मांडला होता. पालिका प्रशासन फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ प्रभाग समितीची झालेली मासिक सभा तहकूब करण्याची सूचना भाजपा नगरसेवक रोहन राठोड यांनी मांडली. अखेर प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर यांनी सभा तहकूब केल्याची माहिती भाजपा नगरसेवक अनिश मकवानी यांनी दिली.के पश्चिम विभागात भाजपाचे सात नगरसेवक असून शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे दोन नगरसेवक आणि शिवसेनेला पाठिंबा देणारे एक अपक्ष असे एकूण तेरा नगरसेवक आहेत. त्यामुळे यापुढेदेखील या प्रभागात भाजपा विरुद्ध सेना आणि काँग्रेस अशी जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या २८ एप्रिल रोजी फेरीवाल्यांवर पालिकेच्या के/पश्चिम विभागातर्फे कारवाई करत नसल्यामुळे भाजपाने सभात्याग केला होता.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यावर अन्न शिजवणारे आणि पदपथ गिळंकृत करणारे फेरीवाले यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भाजपा नगरसेवक रोहन राठोड आणि अनिश मकवानी यांची मागणी होती. तर राज्य सरकारकडे प्रलंबित असलेली फेरीवाला योजना आधी लागू करा, मग फेरीवाल्यांवर कारवाई करा, अशी शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांची मागणी होती. फेरीवाला कारवाईवरून भाजपाविरोधात शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक चकमक उडाली. काँग्रेस नगरसेविका मेहेर हैदर यांनी फेरीवाल्यांचे समर्थन केले.के/पश्चिम विभागाच्या प्रशासनाकडून नुकतीच येथील चारबंगला मार्केटमध्ये झालेली फेरीवाल्यांवरील कारवाई योग्य असल्याचे भाजपाचे रोहन राठोड आणि भाजपा नगरसेवक अनिश मकवानी यांनी सांगितले. रस्त्यावर फेरीवाले अन्न शिजवत असताना मोठी दुर्घटना होऊन हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर पदपथ आणि रस्त्यावर अन्न शिजवणे हे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात असल्याचे नगरसेवक अनिश मकवानी यांनी स्पष्ट केले.परिणामी प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची बैठक वादळी चर्चेत पार पडली.