Join us

आरोप निश्चिती १७ जानेवारीला

By admin | Published: January 05, 2017 6:34 AM

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपींवर १७ जानेवारी रोजी आरोप निश्चिती करणार असल्याचे विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपींवर १७ जानेवारी रोजी आरोप निश्चिती करणार असल्याचे विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. तर पीटर मुखर्जीने सीबीआयचा आपल्याविरुद्ध अजेंडा असल्याचे वक्तव्य विशेष न्यायालयात केले. सीबीआयला पीटरची प्रतिष्ठा मलिन करायची आहे. हत्येचा प्रयत्न करणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे इत्यादी आरोप पीटरवर लावले जाऊ शकत नाहीत. मिखाईलला मारण्याचा प्रयत्न केल्याचा व त्यासाठी कट रचल्याचा आरोप पीटरवर ठेवण्यात आला आहे. परंतु, त्या वेळी पीटर देशाबाहेर होता, असा युक्तिवाद पीटरचे वकील मिहीर घीवाला यांनी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. एच.एस. महाजन यांच्यापुढे केला.पीटरने मारण्याचा प्रयत्न केला, असे खुद्द मिखाईलनेही सांगितले नाही. मिखाईलला मारण्यामागे पीटरचा काय हेतू होता, हेही सीबीआयने स्पष्ट केले नाही. त्यामुळे पीटरला बदनाम करण्याचा सीबीआयचा ‘अजेंडा’ असावा, असे घीवाला यांनी सांगितले. तर संजीव खन्नाच्या वतीने अ‍ॅड. निरंजन मुंदर्गी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. आयटी अ‍ॅक्टमधील कलम ६६ (ए) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, तरी सीबीआयने हे कलम लावण्याचा आग्रह धरला आहे. संजीव खन्नाने कट रचून शीनाची हत्या केली, हे सिद्ध करण्यासाठी सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत, असा युक्तिवाद मुंदर्गी यांनी केला. इंद्राणी मुखर्जी, श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. (प्रतिनिधी)