Join us

लोकल प्रवासाच्या मासिक पाससाठी आजपासून पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:09 AM

मुंबई : दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाचा मासिक पास मिळावा, यासाठी बुधवारपासून ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया सुरू होत आहे. ...

मुंबई : दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाचा मासिक पास मिळावा, यासाठी बुधवारपासून ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया सुरू होत आहे. मुंबईतील ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगरातील १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये ही पडताळणी सुरू राहणार आहे. त्याआधारेच नागरिकांना मासिक पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

रेल्वे स्थानकांवर गर्दी टाळा...

दोन डोस घेतलेल्या पात्र नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ॲप तयार करून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरू होईल. तत्पूर्वी ऑफलाइन प्रक्रिया आठवड्यातील सर्व दिवशी सुरू राहणार आहे. त्या-त्या भागातील रहिवाशांनी नजीकच्या रेल्वे स्थानकावर जाऊन वैध प्रक्रिया पार पाडावी, रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

अशी होणार पडताळणी...

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील १०९ स्थानकांवर तिकीट खिडकीनजीक ३५८ मदत कक्ष असतील. या कक्षावरील पालिकेचे कर्मचारी हे संबंधित नागरिकाने दोन्ही डोस घेतलेल्या अंतिम प्रमाणपत्राची वैधता कोविन ॲपवर तपासतील. छायाचित्र ओळखपत्र पुरावाही तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रे वैध ठरल्यास कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर शिक्का मारण्यात येईल. शिक्का मारलेले प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर सादर केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे पास देण्यात येईल.

...तरच मिळेल रेल्वे स्थानकावर प्रवेश

लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत, छायाचित्र ओळखपत्र पुरावा घेऊन घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्र नसल्यास रेल्वे स्थानकावर प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

बनावट प्रमाणपत्र आणल्यास कारवाई...

बनावट प्रमाणपत्र आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड विधान संहिता यानुसार कठोर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सूट...

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी सध्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असो वा नसो त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा असेल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मदत कक्ष - सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ११.