लोकलच्या पाससाठी आजपासून पडताळणी; १०९ स्थानकांवर ऑफलाइन प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:01 AM2021-08-11T07:01:44+5:302021-08-11T07:02:38+5:30

मुंबईतील ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगरातील १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये ही पडताळणी सुरू राहणार

Verification from today for local pass for fully vaccinated persons | लोकलच्या पाससाठी आजपासून पडताळणी; १०९ स्थानकांवर ऑफलाइन प्रक्रिया

लोकलच्या पाससाठी आजपासून पडताळणी; १०९ स्थानकांवर ऑफलाइन प्रक्रिया

Next

मुंबई : दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाचा मासिक पास मिळावा, यासाठी बुधवारपासून ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया सुरू होत आहे. मुंबईतील ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगरातील १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये ही पडताळणी सुरू राहणार आहे. त्याआधारेच नागरिकांना मासिक पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

रेल्वे स्थानकांवर गर्दी टाळा...
दोन डोस घेतलेल्या पात्र नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ॲप तयार करून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरू होईल. तत्पूर्वी ऑफलाइन प्रक्रिया आठवड्यातील सर्व दिवशी सुरू राहणार आहे. त्या-त्या भागातील रहिवाशांनी नजीकच्या रेल्वे स्थानकावर जाऊन वैध प्रक्रिया पार पाडावी, रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

...तरच रेल्वे स्थानकावर प्रवेश
लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत, छायाचित्र ओळखपत्र पुरावा घेऊन घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्र नसल्यास रेल्वे स्थानकावर प्रवेश नाकारण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानकांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

अशी होणार पडताळणी...
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील १०९ स्थानकांवर तिकीट खिडकीनजीक ३५८ मदत कक्ष असतील. या कक्षावरील पालिकेचे कर्मचारी हे संबंधित नागरिकाने दोन्ही डोस घेतलेल्या अंतिम प्रमाणपत्राची वैधता कोविन ॲपवर तपासतील. छायाचित्र ओळखपत्र पुरावाही तपासतील. 
पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रे वैध ठरल्यास कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर शिक्का मारण्यात येईल. शिक्का मारलेले प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर सादर केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे पास देण्यात येईल.

बनावट प्रमाणपत्र आणल्यास कारवाई...
बनावट प्रमाणपत्र आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड विधान संहिता यानुसार कठोर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. पासधारकांनी प्रवास करताना मास्क लावण्यासह अन्य नियम काटेकाेर पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सूट...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी सध्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असो वा नसो त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा असेल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Verification from today for local pass for fully vaccinated persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.