- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत दररोज जमा होणाऱ्या एक हजार किलो पालापाचोळा व जैविक कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यात गांडूळ आणि खत आपोआप वेगळे होणार आहे. या प्रकल्पातून तयार होणारे गांडूळखत व जीवामृत महापालिकेच्याच उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे. खतनिर्मितीनंतर खत व गांडूळ यांचे विलगीकरण करण्याची गरज नसणारा हा या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे खत तयार झाल्यानंतर त्याचा लगेच वापर करणे शक्य होणार आहे.राणीबागेच्या ४८ एकरांच्या परिसरात अनेक वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत. त्यामुळे या उद्यानात झाडांचा पालापाचोळा, फांद्या, प्राण्यांना देण्यात आलेल्या भोजनाचे अवशेष, प्राण्यांचे मलमूत्र यासारखा दररोज सुमारे एक हजार किलो एवढा जैविक कचरा तयार होतो. हा कचरा आतापर्यंत कचराभूमीवर पाठविण्यात येत होता. मात्र आता या कचऱ्यावर प्रक्रिया करून गांडूळखत निर्मिती करण्यात येणार आहे. बागेच्या मुख्य अंतर्गत प्रवेशद्वाराजवळील सुमारे १ हजार ३८७ चौरस फुटांच्या जागेत हा गांडूळखत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत पालिकेने महिला बचत गटाच्या सहकार्याने हा अभिनव प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पामध्ये खतनिर्मितीनंतर खत व गांडूळ यांचे विलगीकरण आपोआप होणार असून, अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याचा पालिकेचा दावा आहे. या प्रकल्पाची पालिका आयुक्त अजय मेहता यांनी नुकतीच पाहणी केली.वर्षाला ५० हजार किलो गांडूळखतया गांडूळखत निर्मिती प्रकल्पामध्ये दररोज सुमारे एक हजार किलो कचरा टाकण्यात येत आहे. यानुसार वर्षभरात तीन लाख ६५ हजार किलो कचऱ्यापासून ४० ते ५० हजार किलो गांडूळखताची निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. यासोबतच दररोज साधारणपणे ४० ते ५० लीटर एवढे जीवामृत या प्रकल्पातून प्राप्त होत आहे. या जीवामृताचादेखील गांडूळखताप्रमाणेच उपयोग होतो. वर्षभरात साधारणपणे १५ हजार लीटर एवढे जीवामृत या प्रकल्पातून प्राप्त होण्याची अपेक्षा पालिकेला आहे. रहिवाशांना आवाहन : या प्रकारच्या गांडूळखत निर्मिती प्रकल्पाच्या धर्तीवर आपल्या सोसायटीच्या परिसरात एखादा प्रकल्प उभारायचा झाल्यास इच्छुकांनी महापालिकेच्या विभाग कार्यालयातील घन कचरा व्यवस्थापन खात्याशी संपर्क साधावा. तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी यांच्याशी सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.