वर्सोवा बीच होणार चकाचक, क्लिनिंग मशिनरी रोज गोळा करणार महाकाय कचरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:20 PM2018-08-02T18:20:13+5:302018-08-02T18:26:31+5:30
मुंबईतील समुद्र किनाऱ्यांची जणू कचराकुंडी झाली आहे, अशी नेहमीच टीका केली जाते.
मनोहर कुंभेजकर
मुंबई- मुंबईतील समुद्र किनाऱ्यांची जणू कचराकुंडी झाली आहे, अशी नेहमीच टीका केली जाते. तर मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा रोज समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या कचरा व प्लास्टिकवर आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, अशी विचारणा मुंबई महापालिकेला केली आहे.
मुंबई महापालिका प्रशासन, अंधेरी पश्चिम विधानसभेचे भाजपा आमदार अमित साटम, वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर आदी लोकप्रतिनिधी व बीच क्लिनिंगचे जनक अॅड. अफरोझ शाह यांनी एकत्रितपणे येऊन समुद्रातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर मात करण्यासाठी आणि रोज जमा होणारा कचरा उचलण्यासाठी कोणती आधुनिक मशिनरी पाहिजे, किती कामगार यासाठी लागतील, याचा गांभीर्याने अभ्यास करून यंदाच्या पावसाळ्यापासून नवीन बीच क्लिनिंग पॉलिसी मुंबई महापालिकेने प्रथमच तयार केली आहे.
गेल्या 4 जूनपासून मोरा गाव नाला ते सागर कुटीरच्या अलीकडील भाग असलेला सुमारे 1.5 मिमीचा बीचवरील कचरा हा आधुनिक बीच क्लिनिंग मशीनने उचलला जात असून आजपर्यंत येथील सुमारे 5500 मेट्रिक टन कचरा येथून कंत्राटदार स्प्रेक्ट्रॉन इंजिनीयर्स यांनी उचलला असून तो पालिकेच्या नॉर्म्सप्रमाणे रोजच्या रोज कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात असल्याची माहिती या कंपनीचे उपाध्यक्ष सुरज गोन्साल्विस यांनी लोकमतशी बोलताना दिली. आज सकाळी सगरकुटीर येथील कचरा या पालिकेच्या नव्या नॉर्म्सप्रमाणे आधुनिक बीच क्लिनिंग मशिनरीचा वापर करून बीचवरील कचरा उचलण्याच्या कामाचा शुभारंभ बीच क्लिनिंगचे जनक अॅड. अफरोझ शाह यांच्या हस्ते आणि आमदार अमित साटम, स्थानिक भाजपा नगरसेवक रोहन राठोड आणि वर्सोवा येथील नागरिकांच्या उपस्थितीत येथील सागर कुटीर समुद्रकिनारी करण्यात आला. मोरा गाव नाला ते सात बंगला येथील सागर कुटीर बीचचा अलीकडील भाग हा अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात येतो. यावेळी येथील बीच सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी अॅड. अफरोझ शाह तसेच सेव्ह वर्सोवा बीच असोसिएशन, सात बंगला येथील नाना-नानी पार्क असोसिएशन या एनजीओ यांनी जातीने लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार साटम यांनी यावेळी केले.
अशी असेल पालिकेची वर्सोवा बीच क्लिनिंगची नवी पॉलिसी
मोरा गाव नाला ते थेट वर्सोवा जेट्टी पर्यत असलेला बीच रोजच्या रोज स्वच्छ करण्यात येईल. त्यासाठी मोरगाव नाला, सगरकुटीर, पिकनिक कॉटेज, मछलीमार, देवाची वाडी व वर्सोवा जेट्टी हा सुमारे दोन्ही मतदारसंघातील 4.5 किमीच्या एकत्रित बीचवरील कचरा रोज काढून बीच चकाचक करण्यात येईल. मोरा गाव ते वर्सोवा बीचवर येथे रोज सुमारे 150 ते 200 मेट्रिक टन कचरा व प्लास्टिक वाहून समुद्रकिनारी येतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे बीच वर कचरा येण्याचे प्रमाण जास्त असते. या नवीन बीच क्लिनिंग पॉलिसी प्रमाणे पावसाळ्यात सकाळी 6 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत कंत्राटदार स्प्रेक्ट्रॉन यांचे एकूण 100 लेबर आणि पाऊस संपल्यानंतर रोज दोन पाळ्यात एकूण 50 लेबर येथील कचरा व प्लास्टिक रोजच्या रोज उचलतील.
या कामासाठी बीच क्लिनिंग मशिनने बीच वरचा कचरा व प्लास्टिक गोळा करून ते ट्रकमध्ये जमा करण्यात येईल. तसेच ट्रकटर विथ जेसीबीचा वापर करून लेबर कचरा घमेल्यात गोळा करून तो यामध्ये टाकण्यात येईल, जेसीबीचा उपयोग करून समुद्राच्या वॉटर लेव्हलला असलेला कचरा गोळा करून तो मग कचऱ्याच्या ट्रकमध्ये टाकण्यात येईल, तसेच शेवटी बीचवर जमा झालेला सर्व कचरा मग कॉम्प्रेकट्टरने गोळा करून सर्व जमलेला कचरा कांजूरमार्ग डंपिंग यार्डवर टाकण्यात येईल.
आज पहिल्याच दिवशी वर्सोवा बीचवरील 15 मेट्रिक टन कचरा व प्लास्टिक कंत्राटदाराने गोळा करेल. बीचवर कचरा करू नका असे मोठे फलक बीचवर ठिकठिकाणी निर्देशित करण्यात येणार असून बीच वृक्ष लागवड देखिल करण्यात येणार आहे. बीच वर राहणाऱ्या नागरिकांना कचरा गोळा करण्यासाठी कचऱ्याचे डबे देखील देण्यात येणार असून, यामधील कचरा कंत्राटदार रोजच्या रोज गोळा करेल, तसेच बीचच्या प्रवेशद्वारापासून ते बीचच्या मार्गावरील कचरा गोळा करण्याची जबाबदारी ही कंत्राटदार म्हणून आमच्यावर असेल, अशी माहिती कंत्राटदार सुरज गोन्साल्विस यांनी दिली. उद्या सकाळी 9 वाजता वर्सोवा बीच येथील देवाची वाडी यर्थे वर्सोवा बीचवरील या नवीन बीच क्लिनिंग योजनेचा शुभारंभ अफरोझ शाह यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.