Join us

वेसावे कोळीवाडा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 4:10 AM

ब्रिटिशांच्या विरोधात देशवासियांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला होता.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : ब्रिटिशांच्या विरोधात देशवासियांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला होता. मात्र ७३ व्या स्वातंत्र्यदिनीही येथील ११४ स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारले गेले नसल्याची खंत वेसावकरांची आहे.कोळी समाजाचे अभ्यासक भगवान भानजी यांनी सांगितले की, येथील सुमारे ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा देऊन तुरुंगवास भोगला. त्यामध्ये कोळी महिलांनीही सहभाग घेतला होता. येथील स्वातंत्र्य सैनिक दिवंगत पोशा नाखवा यांना तर ब्रिटीशांनी टायगर आॅफ वर्सोवा अशी उपाधी दिली होती. त्यांच्या नावाने यारी रोड येथे पालिकेची शाळाही आहे.वेसाव गावातील शांताराम वेसावकर, हिराजी मोतिराम चिखले, गोपीनाथ कास्कर, मंजुळाबाई नामदेव वेसावकर, भालचंद्र तेरेकर, हिराबाई घुस्ते, हरिश्चंद्र घुस्ते, मोतीराम शेंडे यांच्यासह एकूण ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेत्रदीपक कामगिरी केली होती. आज एकही स्वातंत्र्य सैनिक हयात नाहीत. मात्र आजही ७३ व्या स्वातंत्र्यदिनी येथील ११४ स्वातंत्र्य सैनिकांचे साधे स्मारक वेसावे गावात नाही, अशी खंत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके व प्रवीण भावे यांनी व्यक्त केली. वेसावे गावातील स्वातंत्र्य सैनिक विष्णू राघो कोळी (टेलर) यांचे २०१७ साली त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.वेसाव्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांपैकी शेवटचा बुरुज ढासळला होता, अशी माहिती मोहित रामले यांनी दिली. दरम्यान, वेसावे स्मशानभूमीच्या ४५०० चौरस फूट मोकळ्या जागेवर झाले पाहिजे, अशी मागणी माजी नगरसेवक दिवंगत मोतीराम भावे यांनी केली होती, अशी आठवण त्यांचे चिरंजीव व वर्सोवा भाजप मंडल अध्यक्ष पंकज भावे यांनी दिली.

टॅग्स :मुंबई