वर्सोव्यात महापौरांनी लुटला खेळ पैठणीचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 12:47 PM2021-02-03T12:47:14+5:302021-02-03T12:47:39+5:30
या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 59 मधील 480 महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागातील महिलांना लकी ड्रॉ द्वारे साड्या, भेटवस्तू देण्यात आल्या.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : सुमारे ११ महिने मुंबईत कोरोनाशी लढा देत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोलाची भूमिका बजावली. रोजच्या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात व्यस्त असलेल्या महापौरांनी वेळ काढत चक्क वर्सोव्यातील महिलांच्या गुणवत्तेचा शोध घेणाऱ्या खेळ पैठणीचा सुमारे एक तास मनमुराद आनंद लुटला. प्रभाग क्र ५९ च्या शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे व शाखाप्रमुख सतिश परब, बेबी पाटील आयोजित "खेळ पैठणीचा २०२१" या बहारदार कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर उत्साहाने सहभागी झाल्या. वर्सोवा, यारी रोड येथील चिल्ड्रन वेलफेअर शाळेत या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. रस्सीखेच, रॅंपवॉक, नाच,उखाणे या विविध खेळांचा महापौरांनी आनंद लुटला. येथील महिलांचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद आणि शिवसेनेने व प्राचार्य अजय कौल यांनी केलेल्या शानदार आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. अश्या प्रकारच्या आयोजनामुळे आपली एकीकडे संस्कृती जपली जात असतांना दुसरीकडे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो असे गौरवोद्गार महापौरांनी काढले.
या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 59 मधील 480 महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागातील महिलांना लकी ड्रॉ द्वारे साड्या, भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच खेळ पैठणीचा आयोजित करून ४ विजेती महिलांना महिला विभागसंघटक व जेष्ठ नगरसेविका राजूल पटेल यांच्या हस्ते "पैठणी" प्रदान करण्यात आली. विजेत्यांना एकूण 50 बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी नगरसेविका खोपडे, प्रिं.अजय कौल, विधानसभा संघटक शैलेश फणसे, के (पूर्व ) प्रभाग समिती अध्यक्षा प्रियांका सावंत, प्रिती पाटणकर, स्नेहल मोरे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, महिला उपविभागसंघटक जागृती भानजी, शाखाप्रमुख सतिश परब, बेबी पाटील, प्रशांत काशिद महिला विधानसभा संघटक बेबी फर्नांडिस, समन्वयक सौ शितल सावंत आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. दरम्यान महापौरांचा सन्मान कोविडयोध्दा म्हणून प्रिं अजय कौल यांच्या हस्ते करण्यात आला.तर शिवसेनेच्या प्रत्येक समाजकार्यात मदतीचा हात देणारे प्रिं. अजय कौल व प्रशांत काशिद यांचा सन्मान शाखेच्या वतीने महापौरांच्या हस्ते करण्यात आला.