मुंबई : "वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प " समुद्र मार्गे तसेच समुद्राला, समुद्र किनारपट्टीवरील ज्या ज्या कोळीवाड्यांना, स्थानिक मच्छिमारांना कायम स्वरूपी बाधित करणार आहे, पारंपरिक मच्छिमारांना, त्यांच्या व्यवसाय उपजिविकेला, समुद्रातील जैव विविधता, मत्स्य संपदा, जैविक साखळी,पर्यावरणाला नेस्तनाबूत,नामशेष करणार आहे. त्यामुळे वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प होवू देणार नाही असा एल्गार काल मालाड पश्चिम भाटी कोळीवाड्यात भाटी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत एमएमआरडीएचे अधिकारी आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत झालेल्या संयुक्त बैठकीत वर्सोवा ते गोराई पट्यातील 11 मच्छिमार सहकारी संस्थांनी कडाडून विरोध केला.
या पट्यातील सर्व कोळीवाड्यांनी स्थानिक मच्छिमार, स्थानिक रहिवाशी व त्या सर्व कोळीवाड्यातील प्रत्येक गावा गावातील मच्छिमार सोसायट्यांच्या पदाधिकारी सदस्यांनी एकमताने, एकमुखाने, एकदिलाने व संघटितपणे केला कडाडून विरोध केला आणि वेळ प्रसंगी "मरो या मारो" हिच आमच्या मच्छिमारांची मुंबईच्या आद्य रहिवाशांची असलेल्या कोळी मच्छिमार समाजाची,स्थानिक मच्छिमारांची भूमिका असल्याचे ठणकावून सांगितल्याची माहिती मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष कोळी यांनी लोकमतला दिली. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर झालेल्या सयुक्त बैठकीत "मरो या मारो", "समुद्र आमच्या कोळ्यांचा, नाही कुणाच्या मालकीचा", "समुद्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या मालकीची" या घोषणा देत सभागृह दुमदुमले व प्रखर विरोध करत उपस्थित मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
२/११/२०२३ रोजी मढ ते गोराई येथील सर्व स्थानिक मच्छिमारांनी या सागरी सेतूच्या अंमलबजावणी साठी चाललेल्या सर्व्हे ला विरोध केला व तो सर्व्हे बंद पाडला होता.या संदर्भात लोकमतने वृत्त दिले होते. मत्स्य व्यवसाय विभागाने पुढाकार घेऊन साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त स.गो.दप्तरदार यांनी मच्छिमार बांधव, मच्छिमार सोसायट्यांचे पदाधिकारी, प्रकल्प राबविणारे प्राधिकरण, एमएमआरडीएचे अधिकारी वर्गाची ही संयुक्त बैठक आयोजित केली होती.
आमच्या सर्व कोळीवाड्यांचा व सर्व कोळीवाड्यातील सर्व मच्छिमार सोसायट्यांच्या या वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्पाला व या प्रकल्पाचे होत असलेल्या सर्व्हेक्षणाला १०० टक्के विरोध आहे हे शासनाच्या संबंधित सर्व विभागांना तसेच एमएमआरडीएमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच संबंधित विभागांच्या सरकारमधील मंत्री महोद्यांना तात्काळ लेखी कळवावे व आज संपन्न झालेल्या बैठकीचा इतिवृतांत उपस्थित सर्व कोळीवाड्यातील सर्व मच्छिमार सोसायट्याना लवकरात लवकर देण्यात यावे अशी एकमुखाने मागणी करण्यात येऊन बैठक संपन्न झाली.
या बैठकीला भाटी मच्छिमार सर्वोदय सह. सोसायटी,मढ दर्या दिप मच्छिमार सोसायटी, वर्सोवा विविध कार्यकारी सह. सोसायटी,मढ विविध कार्यकारी सह. सोसायटी, वर्सोवा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी, हरबादेवी मच्छिमार सर्वोदय सह. सोसायटी पातवाडी,मालवणी मच्छिमार कार्यकारी सह. संस्था,मनोरी फिशरमेन्स सर्वोदय सह. सो. लि,मनोरी मच्छिमार विविध कार्यकारी सह. संस्था, मनोरी सागरदिप मच्छिमार सह. सो. लि,गोराई मच्छिमार सहकारी संस्था आदी विविध कोळीवाड्यातील संचालक मंडळ व मच्छिमार बांधव उपस्थित होते.