Join us

रसिकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल अतिशय कृतज्ञ, त्यांची अत्यंत ऋणी : नयना आपटे

By संजय घावरे | Published: February 26, 2024 4:47 PM

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला 'अमृतनयना' सोहळा 

मुंबई - रसिकांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्ताने माझा सन्मान केल्याबद्दल सर्व रसिकांची अत्यंत ऋणी असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी व्यक्त केली. त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'अमृतनयना' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

रंगभूमी, मालिका, चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या नयना आपटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या रंगभूमीय कारकीर्दीला ७० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत 'अमृतनयना' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सवाईगंधर्व आणि संस्कृती सेवा न्यास यांच्या विद्यमाने मुलुंड येथील कालिदास नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आनंद म्हसवेकर, मकरंद कुंडले, मुकुंद मराठे, मंगला खाडिलकर, नयना यांचे पती विश्वेश जोशी आदी मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी 'प्रतिबिंब' या आगामी आत्म चरित्राचे डिजिटल मुखपृष्ठ आणि शांता आपटे यांच्या 'जाऊ मी सिनेमात?' या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक अशोक समेळ यांच्या हस्ते करण्यात आले.

अशोक समेळ यांना यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव आणि ऑर्गन वादक मकरंद कुंडले यांना कै. अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. अनेक हृद्य आठवणींना उजाळा देत नयना यांच्या अभ्यासू वृत्तीचे आणि मेहनतीचे कौतुक मान्यवरांनी केले. रंगभूमी जगणार्‍या कलावंत अशा शब्दांत  गौरव करत नयना यांच्याकडून युवापिढीने प्रेरणा घ्यायला हवी असे मतही उपस्थितांनी व्यक्त केले.

गायक ज्ञानेश पेंढारकर, निलाक्षी पेंढारकर, अपर्णा अपराजित, मुकुंद मराठे, ऑर्गन वादक मकरंद कुंडले, तबला वादक आदित्य पानवळकर यांनी संगीताचा कार्यक्रम सादर केला. वरदा नृत्यालयाची संचालिका नृत्यांगना गायत्री दीक्षित व सहकारी यांनी कथक प्रकारातून नयना यांना मानवंदना दिली. आकाश भडसावळे, प्रवीणकुमार भारदे, अथर्व गोखले, स्वराली गर्गे यांनी नाट्य सादरीकरण केले. नयना यांनी 'टिळक-आगरकर' या त्यांच्या नाटकातील प्रवेश सादर केला. त्यांच्या गायनानेच या  सोहळ्याची सांगताही करण्यात आली. निवेदन अमेय रानडे आणि तपस्या नेवे यांनी केले, तर मंगला खाडिलकर यांनी नयना यांची मुलाखत घेतली.

टॅग्स :मुंबई