‘त्या’ नवीन पुलाचा फटका वेसाव्याच्या बोटींना नको; मच्छीमारी सहकारी संस्थांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:38 AM2024-02-19T10:38:09+5:302024-02-19T10:39:39+5:30
मढमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुल महत्त्वपूर्ण ठरणार.
मुंबई : मढ-वेसावे अंतर १० मिनिटांत पार करता येणार आहे. वेसावा-मढ फेरी बोटीनेसुद्धा मढ- वेसावे अंतर पार करताना १० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. वेसावे खाडीवर कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिका पूल बांधणार आहे.
एकूणच गेल्या काही दिवसांपासून या महत्वाच्या प्रकल्पाबद्दल चर्चा सुरु आहे. यासंदर्भात वेसावे-मढ येथील स्थानिक मच्छीमार, मच्छीमारी सहकारी संस्थांच्या बैठका परिमंडळ ४ च्या उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली के पश्चिम यांच्या दालनात झाल्या होत्या. या बैठाकांमध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली होती.
विकासाला मच्छीमारांचा विरोध नाही, परंतु, वेसावे खाडीवर होणाऱ्या पुलाचा संबंधित मच्छीमारांच्या ३५० बोटींना अडचण होता कामा नये, असे वेसावकरांचे म्हणणे आहे, तर दोन्ही भागांतील नागरिकांना दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व वेगवान प्रवासासाठी हा पूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मोठ्या उधाणाच्या भरतीच्या अनुषंगाने पुलाची उंची असली पाहिजे त्याच बरोबर खाडीमध्ये येणाऱ्या पिलरमधील अंतर जास्तीत जास्त असावे. कवट्या खाडीच्या तोंडावर येणारा पिलर हा भविष्यात अडचणीचा ठरू शकतो.
पिलरभेावती होणारा पाच फुटांच्या फुटिंगमुळे खाडीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करेल व खाडीत गाळ साचून भविष्यात वेसावा खाडी बुजण्याचा धोका निर्माण होईल. त्याचबरोबर कवठ्या खाडीच्या दक्षिण-उत्तरेतल्या असलेल्या मच्छीमारांच्या मासे सुकविण्याचा जागांवर अतिक्रमण होता कामा नये, अशा सूचना वेसावेच्या काही मच्छीमारांनी उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या होत्या.
दहा वर्षे हा सागरी सेतू व्हावा या दृष्टीने प्रयत्नशील राहिलो आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या सागरी सेतू प्रकल्पासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी विशेष प्रयत्न केले होते. अखेर सर्व अडथळे पार करत हा सागरी सेतू साकारणार असल्याचा मला निश्चितच आनंद आहे. - अस्लम शेख, आमदार, मालाड पश्चिम विधानसभा माजी मंत्री
अशीही सूचना :
महापालिका ब्रिज खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मच्छीमारांना ब्रिजचे पिलर कुठे येणार आहेत, हे प्रत्यक्षपणे जागेवर जाऊन दाखवावे, अशी सूचनादेखील येथील मच्छीमारांनी केली होती.
मच्छीमारांना विश्वासात घेतले नाही. वरळी सी लिंकबाबत मच्छीमारांची झालेली अडचण या पुलाबाबत होऊ नये, अशी मागणी मच्छीमार नेते प्रदीप टपके यांनी केली आहे.