मुंबई- मच्छीमारी बोटींना मिळणारे डिझेल तब्बल ३० रुपये प्रती लिटर महाग झाल्याने मच्छीमारी व्यवसायाची मोठी वाताहत झाली आहे. परिणामी राज्यात सुमारे 70 टक्के मासेमारी नौका बंदरावर उभ्या असल्याने मच्छिमारांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन सरकारने हिरावून घेतले आहे. मासेमारीची आवक कमी झाल्याने माशांचे भाव गगनाला भिडले आहेत. या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि केंद्र व राज्य सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आद्य रहिवासी असलेल्या वेसावे कोळी समाजाचा आज अंधेरी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
वेसावे कोळी जमात, नाखवा मंडळ, व मच्छिमार सहकारी संस्था,मिनी टॉलर्स यांच्या विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
डोक्यावर लाल कोळी टोपी व पारंपरिक कोळी पध्दतीचा पेहराव करून महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. डिझेलचे रिकामे कॅन रस्तावर आपटून, घोषणा देत होते. मच्छिमारी व्यवसायावर अवलंबून असणारे येथील सुमारे 1000 कोळी बांधव व कोळी महिला डोक्यावर लाल कोळी टोपी व पारंपरिक कोळी पध्दतीचा पेहराव करून व आपला धंदा बंद करून या मोर्चात सहभागी झाले होते. यामुळे वेसावे मासळी बाजारात आणि बंदरावर आज शुकशुकाट होता. तर मोर्चा मुळे काही काळ येथील वहातूक व्यवस्था कोलमडून पडली होती.
मच्छीमारांना डिझेल भाववाढीतून सवलत मिळावी, एलईडी पध्दतीने होणारी मासेमारी बंद करावी तसेच प्रलंबित डिझेल विक्रीकर परतावे ताबडतोब द्यावेत, कोळीवाडे संरक्षित करण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन घेऊन मोर्चा निघाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे मच्छिमारांच्या विविध मागणीचे निवेदन अंधेरी उपनगर तहसीलदार सचिन भालेराव यांना देण्यात आले.
यावेळी स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर, वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे, कार्याध्यक्ष पृथ्वीराज चंदी, मच्छीमार नेते प्रदीप टपके, पराग भावे, जयराज चंदी, राजश्री भानजी, जयनंदा भावे, जागृती भानजी, राजहंस टपके, रणजीत काळे यांची समयोचित भाषणे झाली,