मुंबई - दर्याची किरपा आम्हावर, कोळ्यांना पोसतोय समिंदर" असा एल्गार करत वेसावा कोळीवाड्यातील कोळी बांधव एकत्र येऊन "स्वच्छ सागर, सुरक्षित सागर" अभियान आज येथील वेसावे समुद्र किनाऱ्यावर राबवले. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त "भारतीय तट रक्षक दल", "माय ग्रीन सोसायटी" तसेच भारताच्या तमाम पर्यावरण रक्षक प्रशासकीय यंत्रणा व पर्यावरण प्रेमी यांच्या समवेत "आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.
वेसावे कोळीवाड्यातील वेसावा कोळी जमात ट्रस्ट व स्वच्छता मोहीम वेसावा बीच प्रमुख व अखिल कोळी समाज संस्कृती संवर्धन संघ मुंबई अध्यक्ष मोहित रामले यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी ४ ट्रक भरून कचरा गोळा झाला जवळपास ६ मेट्रिक टन - ६००० किलो इतका कचरा गोळा करण्यात आला. अंदाजे सर्वसाधारण उपस्थित साफसफाई करणाऱ्या पर्यावरण प्रेमी बांधवांची संख्या अकराशेच्या वरती होती ज्यात कोळी बांधवांचा मोठा सहभाग होता.
आज सकाळी ६.४५ ला आई हिंगळादेवी मंदिरात देवीची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. हिंगळा देवीला पाया पडून झाल्यावरती मंदिरातून बँड वादनाने सागर तटावर प्रस्थान झाले. वेसावे सागर तटावरती प्रथम सागराची - दर्याची पूजा कोळी बांधवांनी नारळ अर्पण करून केली व कोळी माहिलांनी मनोभावे दर्या सागराची आरती करत गाऱ्हाणे घातले.वेसावे विद्या मंदिर शाळेतील मुलांचा स्वतःचा बँड पथक व स्थानिक बँड पथक उपस्थित होता.
स्थानिक पातळीवर साफ सफाई होणे जरूरी आहेच त्या सोबत कोळी समाजाची संस्कृती जगा पुढे जावी व कोळयांच्या जागा जमिनी वाचाव्यात अशी दर्या सागरास प्रार्थना केली. बंदर सफाई मोहिमेत वेसावे गावातील सर्व गल्ली विभागाचे पदाधिकारी, महिला मंडळे व सभासद उपस्थित होते. तसेच वेसावे गावातील सर्व मासेमारी नाखवा मंडळ, मच्छीमार सहकारी संस्था यांनी वेसावा बंदर सफाई मोहिमेस सहकार्य केले.
स्थानिक वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर, वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस लाकडे,सेक्रेटरी स्वप्नील भानजी, खजिनदार गणेश गणेकर,वेसावा मच्छीमार नाखवा मंडळचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल,कोळी महासंघ सरचिटणीस राजहंस टपके,नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी,मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्था अध्यक्षा राजेश्री भानजी,वेसावा विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष पंकज भावे,वेसावा कोळी महिला सामाजिक संस्था अध्यक्ष शारदा पाटील,अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ मुंबई अध्यक्ष मोहित रामले,शाखाप्रमुख सतीश परब,वेसावा शिवकर कोळी समाज अध्यक्ष संदीप भानजी, माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर, माजी नगरसेविका रंजना पाटील, कोस्ट गार्ड, वरळी डेप्युटी कमांडर के. के. सिंग, व बिनू नायर ,पार्ले टिळक मानजमेंट कॉलेजचे प्रो. श्री भावेश वैती आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोळ्यांचा पोशिंदा असलेल्या दर्या सागर याचा किनारा स्वच्छ करणे व प्लास्टिकच्या भस्मासूरापासून सागरी जिवांचे रक्षण करणे ही काळाची व कोळ्यांची देखील गरज आहे असे राजहंस लाकडे म्हणाले. तर वेसावा कोळी जमात ट्रस्ट चे कार्यकर्ते स्वप्नील भानजी, गणेश गणेकर, वैशाली भुनू ताई इत्यादी उपस्थित होते व गदी मोहिमेचे सर्व व्यवस्थापन, अन्न वाटप सेवा त्यांनी मनापासून पार पाडली व कोळी समाजाचे अतिथी आदरर्तीथ्य दर्शन घडले.
या अभियानामध्ये जुहू चौपाटीचे इस्कॉन- हरे राम हरे कृष्ण मंदिरातर्फे खानपान व्यवस्था सांभाळली होती. अत्यंत चांगल्या पद्धतीने या वर्सोवा जेटीवरती कार्यकर्ते तसेच सागरी सीमा मंच चे सुरेश गुजर, ओशिवरा भाग संयोजक यांनी अत्यंत सुनियोजित असा हा कार्यक्रम घडविला. तसेच वेसावा कोळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते निरंजन भगत, सुरेखा जावली, कोळी कलाकार राजेश खर्डे, प्रीतम भावे, पुष्पा कालथे ह्यांनी रात्रं दिवस माय ग्रीन सोसायटीच्या शर्मिला माळेकर यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
त्रिमूर्ती संदेश खालू (टिमकी) बाजा पथक यांचे सनई वादक व रुपेश मुरुडकर यांनी तर संपूर्ण वेसावचा बंदर किनारा कोळी गीत वाजवून दणाणून सोडला होता व सोबत कोळी नृत्य करणारे कोळी डान्स ग्रुप मुळे कोळी संस्कृती आज जगा समोर आली असे मोहित रामले व प्रसिद्ध कोळी कलाकार राजेश खर्डे यांनी सांगितले.