वेसावा कोळी सी फूड फेस्टिव्हलला दिमाखात सुरूवात, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते झालं उद्धाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 04:46 PM2018-01-27T16:46:28+5:302018-01-27T16:46:45+5:30
वेसावा कोळी सी फूड फेस्टिव्हला शुक्रवारी संध्याकाळी सुरूवात झाली.
मुंबई- वेसावा कोळी सी फूड फेस्टिव्हला शुक्रवारी संध्याकाळी सुरूवात झाली. वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटी समोरील गणेश मैदानात हा कोळी सी फूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. वेसाव्याचे ग्राम दैवत असलेल्या हिंगळा देवी ते महोत्सवाच्या ठिकाणी भव्य बँडच्या निनादात भव्य मिरवणूक काढली. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी या सीफूड फेस्टिव्हलचं उद्घाटन केलं.
यावेळी गजानन कीर्तिकर म्हणाले, वेसावकरांनी सर्वप्रथम रोवलेल्या हा कोळी सी फूड फेस्टिव्हल व्यवसायिक रूपामध्ये वाढीस लागावा तसंच कोळी बांधवांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुखांचं कोळीबांधवांवर प्रेम होतं व त्यांच्यांच सान्निध्यात राहिल्यामुळे खासदार म्हणून निवडून आल्या दिवसापासून वर्सोव्याचे कोळी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या वर्सोवा खाडीतील गाळ काढण्याचे कामही आपल्या स्वत:च्याच पाठपुरवठयामुळेच सुरू झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.मुंबईचे आद्य नागरिक असलेल्या कोळीबांधवाचा उत्कर्ष सतत वाढीस लागतील अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
केरळनंतर मासेमारीत देशात दुसरा क्रमांक असणाऱ्या वेसावकरांची पुरातन संस्कृती,परंपरा,अटकेपार प्रसिध्द असलेली वेसावकरांची कोळी गीते-नृत्य यांची महती आजच्या तरुण पिढीला समजावी. तसेच मनोरंजनाबरोबर फेस्टिवलमधील वेसावकरांच्या कोळी महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या मसालेदार रुचकर म्हावरांना मोठी बाजारपेठ मिळावी हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे.
या फेस्टिव्हलचे यजमानपद यंदा वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीचे मिळाले आहे .वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेड,वेसावा कोळी मच्छीमार नाखवा मंडळ ट्रॉलर,वेसावा कोळी जमात रिलीजस चॅरिटेबल ट्रस्ट,वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या वेसावे गावातील प्रमुख संस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव साजरा केला जात आहे.
या फेस्टिव्हलमध्ये सुमारे ५०० कोळी महिलांनी तयार केलेले सरंगा, रावस, सुरमई, घोल, कोलंबी, शेवड़ी, चिंबोरी, तिसऱ्या शिवल्यापासून बाबोंके बोबील अशा विविध प्रकारच्या रुचकर मत्स्य आहारा बरोबर गरम गरम तांदळाची भाकरी खाण्याची मजा येथील 55 स्टॉल्स मध्ये मिळणार आहे. तर दर्यावर्दी वेसावकर आणि कोळी महिला आपल्या पारंपारिक वेषात म्हावरप्रेमींचे डोक्यात चांदवले व गजरा घालून आदरतिथ्य करत आहेत.