Join us

वेसावे कोळीवाडा झाला कोरोनाचा हॉटस्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 7:58 PM

325 नागरिकांना कोरोनाची  झाली लागण तर 11 नागरिकांचा झाला मृत्यू

मनोहर कुंभेजकर

मुंबई : पालिकेच्या के पश्चिम वॉर्ड मध्ये मोडत असलेला आणि अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून सुमारे 6 किमी अंतरावर असलेला वेसावे कोळीवाडा मासेमारीत राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र वेसावे कोळीवाडा हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. 

पालिकेच्या प्रभाग क्रमांक 59 मध्ये मोडत असलेल्या वेसावे कोळीवाड्यात आणि परिसरात कम्युनिटी स्प्रेड झाल्यामुळे येथे रोज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून येथील मच्छिमारांमध्ये आणि नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता व चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथील तेरे गल्ली, बुधा गल्ली,पाटील गल्ली,गोमा गल्ली,बाजार गल्ली,मांडवी गल्ली, डोंगरी गल्ली,शिव गल्ली आणि जवळ असलेल्या खोजा गल्ली या विविध गल्ल्यांमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत. तर येथील यारी रोड आणि परिसरातील असलेल्या गृहनिर्माण सोसायटीत देखिल कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर त्यात राज्य सरकार व महापालिकेने लॉकडाऊन शिथील केल्याने नागरिक रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत  वेसावे कोळीवाड्यात 325 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 11 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी लोकमतला येथील कोरोनाजन्य सद्यस्थितीची माहिती दिली. वेसावे कोळीवाड्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी विशेष टास्क फोर्स नेमून सर्व प्रकारची प्रभावी उपाययोजना करावी.तसेच येथील नागरिकांच्या घरोघरी जाऊन मास स्क्रिनिग व स्वॅब टेस्ट करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे आणि ट्विट करून दिली आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करून त्यांनी येथील कोरोनाजन्य स्थितीची माहिती दिली आहे.

आपण स्वतः सुरवातीला येथे कोरोनाचे  10 रुग्ण मिळाल्यावर दि,18 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वेसावे कोळीवाडा सील करण्याची मागणी केली होती. तर आपण स्वतः दि,18 एप्रिल रोजी सायंकाळी पालिका व वर्सोवा पोलिसांच्या मदतीने हा कोळीवाडा सील केला होता याची आठवण त्यांनी करून दिली. दि,28 एप्रिल रोजी रात्री येथील कोरोनाचा पहिला बळी गेला होता. सुरवातीपासून वेसावे कोळीवाड्याकडे वेळीच लक्ष दिले नसल्याने आज हा भाग कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून येथील कोरोनाच्या सद्यस्थितीवर लोकमतने बारीक लक्ष ठेवले आहे. लोकमतने याबाबत सातत्याने वृत्त देऊन पालिका प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई