वेसावे कोळीवाड्याची विसर्जनाची आगळी वेगळी परंपरा
By मनोहर कुंभेजकर | Published: September 27, 2023 07:09 PM2023-09-27T19:09:21+5:302023-09-27T19:09:35+5:30
या संस्थेला गेल्या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली होती.
मुंबई- वेसावे कोळीवड्याची आगळी वेगळी विसर्जन परंपरा आहे.येथे शिपील(छोट्या होड्या) यांचा पुढे दोन व मागे दोन असा चार शिपीलचा(छोट्या होड्या) तराफा करून मध्यभागी गणेश मूर्ती ठेवली जाते.मग खोल समुद्रात फळी बाजूला करून गणेश मूर्तीचे सुखरूप विसर्जन करण्यात येते.गेली 36 वर्षे मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे सुमारे ३५० ते ४०० सभासद या विसर्जन सोहळ्यात सक्रीय असतात.या संस्थेला गेल्या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली होती.
गेल्या वर्षी सुमारे २५ तासांनी येथील विसर्जन सोहळा पार पडला होता. समुद्राला ओहोटी आल्यावर काही काळ येथील विसर्जन सोहळा बंद असतो.गेल्या वर्षी शिपीलच्या तराफ्यामधून ७० मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. शिपील मधून गणेश मूर्तींच्या विसर्जनाची येथील आगळी वेगळी परंपरा आहे अशी माहिती मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष विकास बाजीराव व सचिव जोगेंद्र राजे यांनी दिली.
येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा बघण्यासाठी अनेक नागरिक वेसावे समुद्रकिनारी गर्दी करतात.तर वेसावे गावातून गणेश मूर्ती विसर्जनाला मार्गस्थ होतांना वेसावकर गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. तर गावात जणू उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण असते.यंदा परिमंडळ 4 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त डॉ.पृथ्वीराज चव्हाण यांनी विसर्जनाची पालिकेतर्फे चांगली व्यवस्था केली आहे.येथे फ्लड लाईट्सची देखिल व्यवस्था केली आहे.
दरवर्षी येथे 70 ते 80 मोठे गणपती विसर्जनाला येतात.यंदा आरे तलावात विसर्जनाला बंदी असल्याने वेसावे कोळीवाड्यात जास्त गणपती विसर्जनाला येतील अशी शक्यता उपाध्यक्ष विशाल मांडवीकर व खजिनदार नरेंद्र कास्कर यांनी व्यक्त केली. येथील विसर्जन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जगदीश भिकरू,गौतम कास्कर,हरेश्र्वर घुस्ते, विरेंद्र मासळी, विक्रांत पेदे,भरत पेदे, उद्धव भूनगवले, कल्पेश कास्कर, मितेश चाके, अलंकार चाके, मोहित पेदे, कोमल चाके,प्रियंका पेदे आदी मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे सदस्य आणि 350 ते 400 कार्यकर्ते सज्ज झाले आहे.