मनोहर कुंभेजकर/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ११ नोव्हेंबर १९४३ रोजी पंडित नेहरू यांनी वेसाव्याला भेट दिली होती. या आठवणी अजूनही येथील कोळी बांधवांच्या मनात ताज्या आहेत. त्यात आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेसावे किनारी सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केल्याने वेसाव्याचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर झळकले आहे. पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी हा वेसावकरांचा प्रवास त्यामुळेच ऐतिहासिक ठरला आहे. १५ आॅक्टोबर २०१५ ते आजपर्यंत गेले ८६ आठवडे वर्सोवा समुद्रकिनारी दर शनिवारी आणि रविवारी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवून ५५ लाख किलो कचरा गोळा करण्याचा विक्रम पेशाने वकील असलेल्या अफरोज शाह यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अफरोज यांचा मुक्तकंठाने गौरव केल्याने ही बाब संपूर्ण देशभर पसरली. अफरोज यांच्या कार्याचा गौरव म्हणून वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी त्यांना वर्सोवा भूषण पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित केले होते. वेसाव्याला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ११ नोव्हेंबर १९४३ रोजी भेट दिली होती. तेव्हा त्यांनी किनारी मोठी जाहीर सभादेखील घेतली होती. त्यानंतर नेहरूंचे पणतू काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील ६ मार्च २०१४ रोजी वेसाव्याला भेट दिली होती. काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांनी त्यांना मच्छीमारांच्या प्रश्नांची माहिती देण्यासाठी खास वेसावे कोळीवाड्यात आणले होते. स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्याचे खूप मोठे योगदान होते. वेसावे येथील सुमारे ११४ स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले होते. त्यांना तुरुंगवासदेखील भोगावा लागला होता. स्वातंत्र्यसैनिक पोशा नाखवा यांना ब्रिटिशांनी ‘टायगर आॅफ वर्सोवा’ अशी उपाधी दिली होती. अंधेरी (प.) रेल्वे स्थानकापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या वेसावे गावाने १९३०, १९३२ आणि १९४० साली देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे लढे दिले होते. देशातील अन्य भागातील नागरिकांसाठी ते प्रेरणादायी ठरले होते. पूर्वी मुंबई उपनगर विभागाची मुख्य छावणी पार्ल्यापर्यंत होती. येथूनच संघटित सत्याग्रहाचे कार्य होत असे. वेसावकरांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने काँग्रेसने वेसावे गावाला उपछावणीचा दर्जा बहाल केला होता. वेसावा कोळी जमातीच्या घरवाडीत सत्याग्रहांची शिबिरे भरत. या शिबिरात कस्तुरबा गांधी, बाळासाहेब खेर, जमनालाल बजाज, वैकुंठलाल मेहता आणि अन्य दिग्गज मार्गदर्शन करत असत. दिल्लीकरांच्या कानी वेसावकरांची कीर्ती पोहोचली होती. खास येथील कोळी बांधवांचे कौतुक करण्यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ११ नोव्हेंबर १९४३ रोजी वेसावे कोळीवाड्यात आले होते. वेसावे येथील स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेवर त्यांची विशाल सभा झाली होती. या सभेत बाळासाहेब खेर यांनी देशाचे स्वातंत्र्य जवळ आले असून स्वतंत्र भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतील, अशी घोषणा पहिल्यांदा केली होती. पुढे ती प्रत्यक्षात उतरली. तेव्हा वेसावकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, अशी माहिती येथील कोळी समाजाचे गाढे अभ्यासक भगवान भानजी यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र या ११४ स्वातंत्र्यसैनिकांचे साधे स्मारक वेसावे गावात अद्याप उभे राहिलेले नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.माझी जबाबदारी अधिकच वाढली थेट पंतप्रधानांकडून कौतुक झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. तथापि, या गौरवामुळे माझी जबाबदारी खूप वाढली आहे. यापुढेही अजून जोमाने स्वच्छता मोहीम आम्ही राबवणार आहोत. - अॅड. अफरोज शाह, वेसावे किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेचे प्रणेतेनरेंद्र मोदींनी वेसाव्याला भेट द्यावी : वेसावे समुद्रकिनारी नेहरूनंतर ७१ वर्षांनी राहुल गांधी यांनी वेसावे कोळीवाड्याला भेट दिली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे भेट देऊन येथील मच्छीमारांशी संवाद साधावा. वेसावे येथील स्वच्छता मोहिमेची आणि अटकेपर पोहोचलेल्या कोळीगीतांचा आस्वाद घ्यावा, अशी आग्रही मागणी मच्छीमार नेते राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी केली.
वेसावकरांचा गौरव, पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी
By admin | Published: May 30, 2017 6:34 AM