वेसावकरांचा ४ मे १० मे पर्यंत एक आठवड्याचा जनता कर्फ्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 04:57 PM2020-05-03T16:57:42+5:302020-05-03T16:58:22+5:30
वेसावे कोळीवाड्यात कोरोनाचे ५५ रुग्ण झाले.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : एकीकडे पालिकेच्या के पश्चिम वॉर्ड मध्ये कोरोनाने ५५० चा आकडा पार केला असतांना, वेसावे कोळीवाड्यात कोरोनाचे ५५ रुग्ण झाले असून येथे कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे. यासाठी ४ ते १० मे पर्यंत एक आठवड्याचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय वेसावकरांनी घेतला आहे. यापूर्वी ११ ते १३ एप्रिल, २४ ते २६ मे असे तीन दिवसांचे दोन जनता कर्फ्यू वेसावकरांनी यशस्वी करून दाखवले होते.
वेसावा गावातील सर्व गावकऱ्यांनी जनता कर्फ्यूचे आयोजन केले असून ४ मे ते १० मे पर्यंत असा एक आठवडा कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. वेसावा गावातील निरनिराळ्या समाज संघटना एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलच्या सभागृहात येथील प्राचार्य व समाजसेवक अजय कौल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच निरनिराळ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या पुढाकाराने जनता कर्फ्यू ची दिलेली हाक लक्षात घेऊन वेसाव्यातील ईस्ट इंडियन क्रिश्चन समाज, कोकणी सुन्नी जमात ट्रस्ट, यंग मुस्लिम कमिटी आणि इतर समाज संघटनांनी या जनता कर्फ्यूला जाहिर पाठिंबा दिला आहे. मागे दोन वेळा तीन दिवस यशस्वी केलेला जनता कर्फ्यू आणि त्या वेळच्या अनुभव लक्षात घेता करोना रुग्णांचे १०० % उच्चाटन करावे यादृष्टीने एक आठवड्याचा जनता कर्फ्यू आयोजित केला आहे. या कालावधीत वेसावे गावातील प्रत्येक गल्ली विभागातील स्वयंसेवक यावेळी सहाय्य व नियंत्रण करणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीला कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके,वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय, सेक्रेटरी राजहंस लाकडे, वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र लडगे, वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नारायण कोळी, शाखाप्रमुख सतीश परब, कोकणी सुन्नी जमात ट्रॅस्टचे सेक्रेटरी सलीम रांजे, बाबा पठाण, ओनिल फर्नांडिस, डॉ.चारूल भानजी आणि वर्सोवा पोलीस ठाण्याचे अधिकारी, महानगर पालिका के पश्चिम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.