Join us

वेसावकरांचे वादळी वाऱ्यांमुळे 50 कोटींचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 7:00 PM

राज्यात मासेमारीत वेसावे हे मोठे बंदर आहे, मासेमारीत देशात गुजरात, केरळपाठोपाठ वेसाव्याचा 1 ऑगस्टपासून मासेमारीच्या नव्या मोसमाला सुरुवात झाली,

- मनोहर कुंभेजकरमुंबई-राज्यात मासेमारीत वेसावे हे मोठे बंदर आहे, मासेमारीत देशात गुजरात, केरळपाठोपाठ वेसाव्याचा 1 ऑगस्टपासून मासेमारीच्या नव्या मोसमाला सुरुवात झाली, खरी मात्र गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा आलेली वादळे आणि वादळी वाऱ्यांमुळे वेसावे बंदरातील तब्बल 72 दिवस मासेमारी ठप्प झाली आहे. गेल्या तीन महिन्यात येथील सुमारे 350 मच्छीमार बोटी बंदरात नांगरून ठेवल्या आहेत.परिणामी वेसावकरांचे वादळी वाऱ्यांमुळे 50 कोटींचे नुकसान झाले असून 150 कोटी मासळीच्या निर्यातीला ब्रेक लागला आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर हा मासेमारीचा सुगीचा हंगाम आहे. मात्र या काळात फक्त 18 दिवस मासेमारी झाल्याने मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे, असा तक्रारीचा सूर वेसावकरांनी पेश केला. वादळे आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीत मच्छिमारांसाठी सुमारे 500 कोटींची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

आज दुपारी येथील भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी वेसावे बंदराला भेट दिली. वादळी वाऱ्यांमुळे वेसावकरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी वेसावे बंदराला भेट देऊन येथील नाखवा मंडळ आणि विविध मच्छीमार सहकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळाशी सविस्तर चर्चा केली. यावेळी सलग दुसऱ्या वेळी आमदार म्हणून निवडून आल्याबद्धल वेसावा कोळी मच्छिमार नाखवा मंडळ (ट्राॅलर)चे अध्यक्ष देवेंद्र काळे व येथील मच्छिमार सहकारी संस्थांनी भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

नगरसेविका रंजना पाटील, वर्सोवा भाजपा मंडळ अध्यक्ष पंकज भावे, देवेंद्र काळे, उपाध्यक्ष पराग भावे, सेक्रेटरी गजानन देव, खजिनदार जितेंद्र टपके, संस्थापक पृथ्वीराज चंदी, वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड माजी अध्यक्ष नारायण कोळी, प्रदीप टपके, हरेश भानजी, उपाध्यक्ष नाशिकेत जांगले, वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष चंदन पाटील, प्रवीण भावे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुन्हा येथून आमदार म्हणून निवडून दिल्याबद्धल लव्हेकर यांनी उपस्थित वेसावकरांचे जाहीर आभार मानले. येथील कोळी बांधवांवर अन्याय झाल्यास तो सहन करणार नाही. येथील मच्छिमार बांधवांचे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्यासाठी आणि 18 महिन्यांपासून प्रलंबित असलेला सुमारे 19 कोटी डिझेल परतावा परत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवेन, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी या संदर्भात मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांच्याशी मोबाइलवरून चर्चा देखील केली. जसे जमिनीवरील शेतकऱ्यांना ओला व कोरड्या दुष्काळात नुकसान भरपाई दिली जाते, त्याप्रमाणे समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे वादळात, नुकसान झाल्यास त्यांना देखील नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. यासाठी दुष्काळाचे निकष बदलण्यासाठी कालबाह्य सरकारी नियम व अध्यादेश बदलण्याची गरज असल्याचे लव्हेकर यांनी स्पष्ट केले.