मनोहर कुंभेजकर
मुंबई : एकीकडे देशात येत्या दि,3 मे पर्यंत सध्या तरी लॉकडाऊन असला तरी वेसावकरांनी आज पहिल्याच दिवशी वेसावे कोळीवाड्यात कडकडीत जनता कर्फ्यू पळाला आहे.येथे येत्या दि, 26 एप्रिल दरम्यान तीन दिवसाचा जनता कर्फ्यू आहे.
के पश्चिम वॉर्ड मध्ये कालपर्यंत कोरोनाचे 264 रुग्ण असतांना,वेसावे गावात कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढतच आहे.त्यामुळे वेसावे गावात करोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता ही साखळी खंडित करण्यासाठी वेसावा गावात आज पासून रविवार दि,26 एप्रिल या दरम्यान तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.या दरम्यान वेसावकर जनता कर्फ्यू कडकडीत पाळणार आहेत असा एकमुखी निर्णय वेसावकरांनी घेतला आहे.यापूर्वी वेसावकरांनी दि,11 ते 13 एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यू पाळला होता.
वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या पुढाकाराने गावातील सर्वधर्मीय मंडळांच्या संमतीने हा लॉक डाऊन निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत उघडी असलेली सर्व दुकाने व मासळी बाजार आज बंद होता.रस्त्यात, गल्लीमधून फिरण्यास अथवा पादचा-यांना चालण्यास देखिल मज्जाव करण्यात आला होता. या कर्फ्यूच्या कालावधीत कोणी ही घराबाहेर पडू नये अथवा खरेदी-विक्रीसाठी जाऊ नये या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,सगळ्यांनी घरातच राहून हा जनता कर्फ्यू यशस्वी करावा असे आवाहन वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय यांनी केले आहे तर या जनता कर्फ्यूचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक गल्ली विभागातील स्वयंसेवक तैनात असल्याचे ट्रस्टचे सचिव राजहंस लाकडे यांनी सांगितले.
दरम्यान वेसावे गावात कोरोनाची संख्या वाढत असून पालिकेने गांभीर्याने वेसावे गावाकडे पालिकेच्या के पश्चिम वॉर्डने जातीने लक्ष दिले पाहिजे.तसेच येथे डॉक्टरांची संख्या देखिल वाढवण्याची गरज असल्याचे मत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी शेवटी व्यक्त केले.