Join us

पालिका मुख्यालयावरील आक्रोश मोर्चाला वेसावकरांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:09 AM

मुंबई-उठ कोळ्या जागा हो, दर्या सागरांचं तुफान हो असा एल्गार करत मुंबई महापालिका आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार ...

मुंबई-उठ कोळ्या जागा हो, दर्या सागरांचं तुफान हो असा एल्गार करत मुंबई महापालिका आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीतर्फे पालिका मुख्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाला मुंबईतील विविध कोळीवाडे आणि संलग्न संस्थांनी पाठिंबा दिला आहे.

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. वेसावे कोळीवाड्यात आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी ते आले होते. वेसावकर आणि येथील मच्छीमार संस्था आणि कोळी महिलांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप टपके यांनी सांगितले.

"वेसावा कोळी जमात ट्रस्ट" तर्फे तमाम कोळी संघटना, संस्था, समाज हितचिंतक आणि सर्वांनी एकत्र येऊन *मुंबई ही कोळ्यांची असा एल्गार करून सरकार व पालिका प्रशासनाची झोप उडवूया असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय यांनी केले आहे.

स्वार्थी राजकारणी व मुंबई महानगर पालिका आज मुंबईच्या या स्थानिक भूमिपुत्र कोळी बांधवांना त्यांच्याच भूमितून नष्ट करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या कोळी लोकांनी मुंबईत बाहेरुन येणाऱ्या लोकांना राहण्यास छप्पर दिले, त्याच कोळी लोकांचे राहत्या घराचे व मच्छी मार्केट मधील छप्पर उद्ध्वस्त करण्यात महानगर पालिका व्यस्त दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडई (क्रॉफर्ड मच्छी मार्केट) व दादर मच्छी मार्केट (स्व. मीनाताईं ठाकरे मासळी बाजार) यावर हातोडा व स्थलांतर प्रकरण ताजे आहे असे सचिन चिंचय यांनी सांगितले.

------------------------------------